श्रीनगर - जम्मू विमानतळावर पाच मिनिटांच्या अंतराने दोन स्फोट झाल्याची माहिती आहे. एक स्फोट हा तांत्रिक विभागात तर दुसरा मोकळ्या जागेत झाल्याची माहिती आहे. यात दोन जवान जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बॉम्ब निकामी पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत. तर स्फोट किती मोठा होता, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही. जम्मू हवाई तळाजवळ स्फोट घडवण्यासाठी दोन ड्रोनचा वापर करण्यात आल्याची माहिती आहे.
इमारतीच्या छताला किरकोळ नुकसान झाले आहे. तसेच कोणत्याही उपकरणांचे नुकसान झाले नसून चौकशी सुरू असल्याचे भारतीय हवाई दलाने सांगितले. तसेच नरवाल परिसरातून एका दहशतवाद्यास अटक करण्यात आली असून 5 किलो आयईडी जप्त करण्यात आल्याचे जम्मू-काश्मीर पोलिसांनी सांगितले.
दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला -
शनिवारी काश्मीरमध्ये ग्रेनेडमध्ये हल्ला झाला होता. दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्यानंतर परिसरात नाकाबंदी करण्यात आली आहे. ग्रेनेड फेकलेल्या दहशतवाद्यांचा सुरक्षा दलाकडून शोध सुरू आहे. ग्रेनेडचा स्फोट झाल्यानंतर मोठे नुकसान झाले नाही. यापूर्वी दहशतवाद्यांनी ७ मे रोजी श्रीनगरमधील नवा बाजार परिसरातील सुरक्षा दलावर ग्रेनेड फेकले होते. शोपियान जिल्ह्यात तीन दहशतवाद्यांना सुरक्षा दलाने कंठस्नान घातल्यानंतर ग्रेनेड फेकल्याची घटना समोर आली आहे.
चकमकीत दहशतवादी ठार-
सैन्यदलाने चकमकीत दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात असलेल्या हांजीपोरा गावात एका दहशतवाद्याला ठार होते. हा दहशतवादी अवंतपुरामधील संभूरा येथील रहिवाशी होता. मुर्तुजा अहमद दर असे या ठार झालेल्या दहशतवाद्याचे नाव होते. तर दुसरा दहशतवादी सैन्यदलाला शरण आला आहे. सैन्यदलातील अधिकाऱ्याने दहशतवाद्याला शरण येण्याचे आवाहन केले होते. मेजर शुक्ला यांनी आवाहन केल्यानंतर दहशतवादी हा शरण आला आहे. हांजीपुरा येथील घरात चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. यातील एक दहशतवादी ठार तर दुसरा शरण आल्याने इतर दोन दहशतवाद्यांचा गावात शोध सुरू असल्याचे आयजीपी विजय कुमार यांनी सांगितले. अजूनही गावामध्ये दोन दहशतवादी लपून बसल्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा - VIDEO: जवानांनी दहशतवाद्यांना अशी दिली अखेरची संधी, १ ठार १ शरण