नवी दिल्ली : तिहार कारागृहात कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरियाचा कॅमेऱ्यासमोर मारेकऱ्यांनी खून केला होता. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली होती. याप्रकरणी तिहार कारागृह हा माफियांचा अड्डा बनल्याची टीका करण्यात येत होती. मात्र तिहार कारागृहात झालेल्या कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरीयाच्या खुनानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तिहार कारागृहातील तब्बल 99 पोलीस अधिकाऱ्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
पहिल्यांदाच 99 अधिकाऱ्यांची उचलबांगडी : कुख्यात गुंड टिल्लू ताजपुरिया याच्या खुनानंतर मोठी कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. पहिल्यांदाच तुरुंग अधिकाऱ्यांना इतक्या मोठ्या प्रमाणावर हलवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कारवाईत 11 उपअधीक्षक आणि 12 सहायक अधीक्षकांचीही उचलबांगडी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. सुमारे डझनभर हेड वॉर्डन आणि वॉर्डन यांचा या बदलीत समावेश आहे. दुसरीकडे तिहार तुरुंगातील बदलीच्या एवढ्या मोठ्या कारवाईचा संबंध सर्वोच्च न्यायालयात दिल्ली सरकारच्या विजयाशी जोडल्या जात आहे.
तिहार सुरक्षेची विश्वासार्हता ढासळली : तिहार कारागृहात गेल्या काही वर्षात अनेक प्रकरणे समोर येत आहेत. तिहार कारागृहातून खंडणीखोर रॅकेट चालवत असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यासह गेल्या काही वर्षांत तिहार कारागृहात टोळीयुद्ध आणि बंदीवान यांच्यातील संघर्ष वाढला आहे. यामुळे तिहार कारागृहाची प्रतिष्ठा डागाळली आहे. कारागृहाच्या आत आणि बाहेर आपली दहशत कायम ठेवण्यासाठी गुंड आणि त्यांचे साथीदार वेळोवेळी हल्ले करतात. गैरप्रकार करणाऱ्यांसोबत अधिकाऱ्यांची मिलीभगत असल्याचे अनेकदा आरोप करण्यात आले आहेत.
माजी मंत्र्यांच्या सेलमधील अधिकाऱ्यांची बदली : दिल्ली सरकारमधील अनेक माजी मंत्री तिहार कारागृहात बंद आहेत. तिहार कारागृहात टिल्लू ताजपुरियाचा खून झाल्यानंतर तब्बल 99 अधिकाऱ्यांची उचलबांगडी झाली. यात दिल्लीतील माजी मंत्री असलेल्या नेत्यांच्या सेलमधील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. दिल्ली सरकारमधील माजी मंत्री सत्येंद्र जैन हे देखील तिहारच्या कारागृहात बंद आहेत. त्यांच्यासह माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हे देखील दिल्लीच्या तिहार कारागृहातच बंद आहेत. या दोन्ही माजी मंत्र्यांच्या सेलमधील अधिकाऱ्यांचीही यावेळी उचलबांगडी करण्यात आली आहे.
हेही वाचा -