हेदराबाद - ओरिसा राज्यातून अहमदनगरला तस्करी होत असलेला 900 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. याची किंमत 2 कोटी रुपये आहे. हैदराबादच्या रचकोंडा पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या कारवाईत 4 जणांना अटक केली आहे. यातील ३ जण अहमदनगरमधील संगमनेरच्या कोपरगावातील रहिवासी आहेत. यातील मुख्य आरोपी योगेश गायकवाड फरार आहे.
आज पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन ही कारवाई करण्यात आली. विशेष ऑपरेशन टीम (SOT), एलबी नगर झोनच्या पथकांनी अलएरपोलिससह 4 आंतरराज्य अमली पदार्थ तस्करांना पकडले यामध्ये विकास बबन साळवे, विनोद चंद्रवणकाळकर, किशोर तुळशीराम वाडेकर आणि कोसा चिट्टी बाबू यांचा समावेश आहे. NH-163 वरंगल-हैदराबाद महामार्गावर प्रकाश गार्डन जवळ हे तस्कर पोलिसांच्या हाती लागले. त्यांच्याकडून 900 किलो गांजा, एक आयशर (डीसीएम) वाहन जप्त केले. त्यामध्ये नारळ असल्याचे भासवले जात होते. या कारवाईत 5 मोबाईल फोन, गाडी, गांजासह सर्व मिळून सुमारे 2 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याआधी तीन ते चार वेळा याच लोकांनी मलकानगिरी येथून गांजा हैदराबादमार्गे महाराष्ट्रात नेऊन योगेश दत्त गायकवाड यांच्याकडे सुपूर्द केला होता हेही तपासात निष्पन्न झाले आहे. त्यामुळे ही सराईत टोळी असल्याने त्यांच्याकडून इतरही अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी सांगितले.
ही एकूणच कारवाई आयुक्त महेश एम भागवत, अतिरिक्त आयुक्त जी. सुधीर बाबू, यांच्या देखरेखीखाली करण्यात आली.