हैदराबाद - तेलंगणामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुसरीकडे प्राण्यांमध्येही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचे समोर आले आहे. हैदराबादमधील नेहरू प्राणीसंग्रहालयामधील 8 सिंहामध्ये कोरोनाची लक्षणे आढळली आहेत. या सिंहांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
कोरोनाची लागण झाल्याचा संशय असलेल्या 8 सिंहांचे नमुने घेण्यात आले आहेत. हे सिंहाचे नमुने सीसीएमबी (द सेंटर फॉर सेल्युलर अँड मॉलेक्युलर बायोलॉजी) यंत्रणेकडे पाठविण्यात आले होते. हे तपासणी अहवाल आज मिळाले आहेत. तपासणी अहवालानुसार 8 सिंहांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
सिंहांना ठेवण्यात आले विलगीकरणात!
सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहेत. ते उपचाराला प्रतिसाद देत आहेत. त्यांचे वर्तवणूक आणि खाणे सामान्य आहे. प्राणीसंग्रहालयातील कर्मचारी आणि येणाऱ्या अभ्यागतांच्या काळजीसाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने म्हटले आहे.
केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाच्या निर्देशानुसार 2 मे रोजी नेहरू प्राणीसंग्रहालय बंद करण्यात आले आहेत.
हेही वाचा-18 ते 44 वयोगटातील लसीकरणात गुजरातला झुकते माप; जयराम रमेश यांचा आरोप
कोरोनाने देशात हाहाकार-
3 मे रोजीच्या आकडेवारीनुसार कोरोनाचा आजवर 1,99,25,604 लोकांना संसर्ग झाला आहे. 34,13,642 सक्रिय रुग्ण आहेत. 2,18,959 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाची दुसरी लाट असताना जमावाची होणारी गर्दी किंवा सुपर स्प्रेडर कार्यक्रमांवर बंदी लावण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य व केंद्र सरकारला दिले आहेत. तसेच टाळेबंदीव लागू करण्यावर विचार करण्याचे निर्देशही दिले आहेत. दुसरीकडे दिल्लीसह बहुतांश सर्वच राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिवीरचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाबाधितांची संख्या कमी होत नसल्याने देशभरात चिंता वाढली आहे.
हेही वाचा-२०२१ निवडणूक निकालः अस्तित्व, जगणे आणि सुरक्षित रहाण्यासाठी कौल