नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीच्या शास्त्री पार्क परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका घरात एकाच कुटुंबातील 6 जणांचा धक्कादायक मृत्यू झाला आहे. ईशान्य दिल्ली जिल्हा पोलीस अधिकार्यांनी या प्रकरणी माहिती दिली आहे. दिल्ली पोलीस घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल : पोलिसांनी सांगितले की, शुक्रवारी सकाळी शास्त्री पार्क पोलीस स्टेशनला एक पीसीआर कॉल आला होता. कॉलरने सांगितले की, मजार वाला रोड मच्छी मार्केट, शास्त्री पार्क येथील एका घराला आग लागली आहे. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेथे पोलिसांनी जखमींना जगप्रवेश चंद्र हॉस्पिटलमध्ये नेल्याचे पाहिले. पोलिसांना हॉस्पिटलमधून कळाले की 9 लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, ज्यामध्ये 6 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 2 जणांवर उपचार सुरू आहेत.
गुदमरल्याने मृत्यू : पोलीस अधिकाऱ्यांच्या प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, रात्रीच्यावेळी डास मारण्याची एक जळती कॉइल गादीवर पडली होती. त्या कॉइलमुळे तेथे आग लागली. आग विझवताना त्यातून निघणाऱ्या विषारी धुरामुळे घरात उपस्थित असलेले लोक बेशुद्ध झाले आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्यांमध्ये 4 प्रौढ पुरुष, 1 प्रौढ महिला आणि एका दीड वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. दिल्ली पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहचून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.
इंदूर दूर्घटनेत 35 जणांचा मृत्यू : इंदूरमधील बेलेश्वर महादेव झुलेलाल मंदिरात काल रामनवमीच्या दिवशी झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 35 जणांचा मृत्यू झाला आहे. लष्कराने रात्री उशिरा बचावकार्य हाती घेतले. त्यानंतर पहाटे 2 वाजेपर्यंत विहिरीतून आणखी 18 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आज मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आणि गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी दूर्घटनेत मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांची भेट घेतली.