भोपाळ (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशची राजधानी भोपाळच्या बैरागढ कलान येथे एका ठेकेदाराने संपूर्ण कुटुंबासह आत्मदहनाचा प्रयत्न केला. कर्जबाजारी ठेकेदाराने संपूर्ण कुटुंबासह हे आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. ठेकेदाराच्या कुटुंबातील पाचही जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. सर्व सदस्यांना हमीदिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीत, कुटुंबातील सर्वांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे पथक रुग्णालयात पोहोचले. खजुरी पोलीस स्टेशन पोलीस या प्रकरणाचा बारकाईने तपास करत आहेत.
घटनेचा प्रत्येक अंगाने तपास : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोपाळच्या बैरागढ कलानच्या कंत्राटदाराने पत्नी आणि मुलांसह आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. ठेकेदार, त्याची पत्नी आणि मुलांवर हमीदिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रुग्णालयाच्या माहितीवरून खजुरी पोलीस ठाणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. कर्जाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात समोर आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रुग्णालयाव्यतिरिक्त घटनास्थळी देखील पोलिसांकडून तपास केला जात आहे. या सोबतच कुटुंबातील सर्वांचे मोबाईलही तपासले जाणार आहेत. वेगवेगळ्या वेळी कोणाचे फोन आले आणि त्यानंतर काय झाले, याची चौकशी केली जाणार आहे.
शेजाऱ्यांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न : स्टेशन प्रभारी संध्या मिश्रा यांनी सांगितले की, बैरागढ कलान गावात राहणारा किशोर जाटव कंत्राटी व्यवसाय करतो. बुधवारी सकाळी हमीदिया हॉस्पिटलमधून कंत्राटदार किशोर, त्याची पत्नी, मुली आणि एका मुलाने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली. सगळ्यांची अवस्था गंभीर आहे. तपासानंतरच संपूर्ण कुटुंबाने कोणत्या कारणासाठी हे आत्महत्येचे पाऊल उचलले हे समजेल. कुटुंबाला ओळखणाऱ्यांशिवाय त्यांच्या शेजाऱ्यांकडूनही माहिती घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
हे ही वाचा : Bhopal Crime News : धक्कादायक ! तीन वर्षांच्या मुलीवर काकानेच केला बलात्कार