हैदराबाद - शिवसेनेमध्ये नाराजीचा स्फोट झाल्याचे दिसत आहे. सेनेचे ज्येष्ठ नेते आणि कॅबिनेट मंत्री एकनाथ शिदे यांनी आपला सवता सुभा स्थापन केल्याचे दिसत आहे. सुमारे तीस आमदारांना घेऊन ते गुजरातमध्ये तळ ठोकून असल्याचे वृत्त आहे. त्यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत याची माहिती अजून निश्चित नाही. मात्र त्यांची नाराजी नेमकी काय याचा शोध घेतल्यास चार प्रमुख कारणे समोर येत आहेत. त्या कारणांचाच येथे आढावा घेऊयात.
उद्धव ठाकरे - एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमागील प्रमुख कारण हे उद्धव ठाकरे हेच असल्याची चर्चा जोरावर आहे. उद्धव ठाकरे यांनीच सरकारची सगळी सुत्रे हाती घेतल्याने ही नाराजी असल्याचे बोलले जात आहे. फडणवीस सरकार जेव्हा पडले. त्यावेळपासून नवीन सरकारची जुळवा-जुळव सुरू होती. त्यामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाला मोठे महत्व प्राप्त झाले. त्यावेळी त्यांची विधिमंडळ नेतेपती नियुक्तीही करण्यात आली. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडणार असेच मानण्यात येत होते.
एकनाथ शिंदे यांना जरी विधिमंडळ नेतेपदी नियुक्त केले तरी त्यांची मुख्यमंत्रीपदी वर्णी काही लागली नाही. उद्धव ठाकेर यांनीच त्यावेळी ठाकरे घराण्यात इतिहास घडवला आणि स्वतःच मुख्यमंत्रीपदी ते विराजमान झाले. त्याचवेळी एकनाथ शिंदे नाराज यांना पहिली टोचणी लागली. विधिमंडळ नेतेपदी निवड होऊनही ते मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत. मात्र नगरविकास मंत्री, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशी महत्वाची खाती त्यांना देऊन त्यांची नाराजी काही प्रमाणात कमी करण्यात आली. मात्र मुख्यमंत्रीपद न मिळाल्याचे शल्य त्यांच्या मनात कायम राहिले. बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर अगदी निष्ठेने काम करुनही त्याचा उपयोग झाला नाही याचे हे मोठे शल्य त्यांच्या मनात असल्याचे मानले जात आहे.
संजय राऊत यांना अधिक महत्व - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामागे संजय राऊत यांनी महत्वाची भूमिका निभावल्याचे चित्र आतापर्यंत कायम आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे झाकोळले गेल्याचीही चर्चा आहे. कोणत्याही प्रकारची बोलणी करण्यासाठी संजय राऊत यांचाच शिवसेनेकडून पुढाकार असल्याचे दिसत होते. मग ते शरद पवार यांच्याबरोबर चर्चा असो किंवा काँग्रेसबरोबरची बोलणी असोत. त्यामध्ये संजय राऊत यांचाच दबदबा असल्याचे दिसते. त्याचबरोबर राऊत जरी केंद्रात खासदार असले तरी ते राज्यातील सर्वच बाबतीत पहिली प्रतिक्रिया देत असत. आजही तेच प्रवक्ते असल्याने राऊत यांचाच शब्द माध्यमातही प्रमाण मानण्यात येतो. त्यामुळे चर्चेसाठी, धोरणात्मक बोलणीसाठी एकनाथ शिंदे यांना डावलल्याचे चित्र निर्माण झाले. एकनाथ शिंदे यांच्या मनात हेही एक मुख्य शल्य असल्याची जोरदार चर्चा आहे.
आदित्य ठाकरे यांचे ब्रँडिंग - उद्धव ठाकरे ह स्वतः मुख्यमंत्री झाल्याने शिवसेनेच्या आमदारांमध्ये शांतता होती. मात्र त्याचवेळी तरुण नेते आदित्य ठाकरे यांनाही मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले. एवढेच नाही तर एकप्रकारे पुढील मुख्यमंत्री म्हणून शिवसेनेच्या वतीने त्यांचं ब्रँडिंगही सुरू झाले. उद्धव ठाकरे यांच्यानंतर तरी आपल्याला संधी मिळेल अशी अपेक्षा असलेले शिंदे यामुळेही कुठेतरी मागे पडत असल्याचे दिसत होते. राज्याच्या प्रमुख कार्यक्रमांच्यामध्ये तसेच प्रमुख इव्हेंटमध्ये आदित्य ठाकरे यांची प्रमुख उपस्थिती उल्लेखनिय वाढू लागली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आजारी असताना ज्यावेळी पुढील मुख्यमंत्र्यांच्या नावाची चर्चा होत होती. त्यावेळी पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नवाच्या बरोबरीने पुत्र आदित्य ठाकरे यांचेही नाव प्रमुख चर्चेमध्ये होते. त्यावेळीही एकनाथ शिंदे यांचे नाव खिजगणतीतही नव्हते. आदित्य ठाकरे यांचे पुढील मुख्यमंत्री म्हणून ब्रँडिंग सुरू झाल्याचे शल्यही एकनाथ शिंदे यांना होते. त्याची टोचणी लागल्याने शिंदेंची नाराजी वाढतच गेल्याचे सांगण्यात येत आहे.
एकनाथ शिंदे यांना नेहमीच केले साई़डट्रॅक - बाळासाहेबांचे कट्टर समर्थक म्हणून एकनाथ शिंदे यांची ओळख. आनंद दिघे यांच्यानंतर ठाण्यातील शिवसेनेचे मास बेस असलेले मोठे नेते म्हणून एकनाथ शिंदे यांची राजकारणावर मोठी पकड आहे. मात्र अलिकडच्या काळात त्यांना साईडट्रॅक केल्याचेच चित्र दिसत होते. त्यामुळेच एकनाथ शिंदे यांनी काही समर्थक आमदारांचा गट केल्याचेही चित्र एक-दोन कार्यक्रमात दिसून आले. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांच्यासह आले. तसेच त्यांचे समर्थक आमदार घेऊनच ते बाहेर पडले. असे दिसून आले. त्याचबरोबर पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात औरंगाबादमध्येही एकनाथ शिंदे यांनी त्यांचे वेगळेपण दाखवून देण्याचा प्रयत्न केला. त्याची झलक औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली. चाणाक्ष राजकीय विश्लषकांच्या नजरेतून ते सुटले नाही. त्याचाच परिपाक म्हणून आज एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांच्यासह गुजरात गाठल्याचे दिसून येते. नेहमीच शिवसेनेत हिरीरीने काम करुनही मोक्याच्या वेळी साईट ट्रॅक केल्याचे शल्य एकनाथ शिदे यांच्या मनात सलत असल्याचेच यावरुन दिसून येते.
आता एकदा बंडाचा झेंडे तरी शिंदे यांनी हाती घेतल्याचे दिसत आहे. पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा - एकनाथ शिंदेंचे बंड भाजपच्या पथ्यावर पडेल का, मॅजिक फिगरसाठी भाजपला करावी लागेल अजूनही कसरत