कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात 37 कार्यकर्त्यांची हत्या झाल्याचा दावा पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष दिलीप घोष यांनी मंगळवारी केला. पश्चिम बंगाल युनिटचे अध्यक्ष दिलीप घोष यांनी उत्तर प्रदेशमधील कार्यकर्त्यांसोबत 'बंगालमधील परिस्थिती' या विषयावर चर्चा केली. यावेळी ते बोलत होते.
पश्चिम बंगाल निवडणुकीत केलेल्या मेहनतीमुळे पक्षाने 77 जागा जिंकल्या. क्रांतिकारक, अध्यात्मिक नेते, समाजसुधारक अशी ओळख असलेल्या पश्चिम बंगालमध्ये दुर्दैवाने रक्तपात होतेय, असे ते म्हणाले.
राज्यातील कोणत्याही पक्षाच्या कामांसाठी भाजपाचे कार्यकर्ते घराबाहेर पडले की ते परत येतील की नाही, याची भीती असते. गेल्या पाच वर्षांत भाजपाच्या 166 कार्यकर्त्यांचा बळी गेला आहे. तर कार्यकर्त्यांवर 30 हजार पेक्षा जास्त गुन्हे दाखल झाले आहेत. तसेच नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर 37 कार्यकर्ते मारले गेले असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपाचे उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष स्वतंत्र देव यांनी तृणमूल काँग्रेसवर टीका केली. तृणमूल काँग्रेसचे गुंड बंगालमध्ये हत्या करत आहेत. सर्वत्र दहशत आहे. अशा वातावरणात बंगालमधील कार्यकर्ते देशाच्या , बंगाल आणि भाजपाच्या सांस्कृतिक सन्मानासाठी. राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या नेतृत्वात पक्षाचा झेंडा घेऊन पुढे जात आहे, असे भाजपाचे उत्तर प्रदेश युनिटचे अध्यक्ष स्वतंत्र देव सिंह म्हणाले.