कोलकाता (पश्चिम बंगाल) - तब्बल 24 महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याशी लग्न करून त्यांच्याकडील पैसे आणि दागिने लुटून फरार झालेल्या भामट्याला पोलिसांनी अटक केली आहे. अशबुल मोल्ला असे त्याचे नाव आहे. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील सागरदिघी भागातील पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. पीडितेने पोलिसांना सांगितले होते की, तिच्याशी लग्न केल्यानंतर एक व्यक्ती तिचे सर्व पैसे आणि दागिने घेऊन पळून गेला होता.
त्याचा मोबाईल क्रमांकही बंद आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील दत्तोपुकुर पोलीस स्टेशन परिसरातून पोलिसांनी फसवणूक करणाऱ्याला अटक केली. त्याच्याकडून अनेक सिमकार्ड, बनावट प्रमाणपत्रे आणि काही रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी त्याला जंगीपूर न्यायालयात हजर केले, तेथून त्याला सात दिवसांची कोठडी सुनावली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता तो मूळचा उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील बारासात येथील काझीपाडा भागातील असल्याचे पोलिसांना समजले.
28 वर्षीय आशाबुल महिलांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लग्न करायचा. त्यानंतर त्याचे सर्व दागिने व पैसे लुटून तो फरार व्हायचा. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे त्याच्या शेजाऱ्यांनाही याची माहिती कधीच मिळाली नाही. आशाबुल जास्त दिवस कुठेच थांबला नाही. काम संपवून तो पळून जायचा. पोलीस आता आशाबुलने लग्न केलेल्या महिलांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहेत. आशाबुलने आतापर्यंत किती पैसे आणि दागिने घेऊन फसवणूक केली आणि त्यांचे काय केले, याचाही शोध घेतला जात आहे.