पाटणा : बिहारमधील मुंगेर जिल्ह्यात असणाऱ्या ममई गावच्या एका महाविद्यालयातील २५ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे गुरुवारी स्पष्ट झाले होते. मात्र, शुक्रवारी या सर्वांची पुन्हा चाचणी केल्यानंतर हे सर्वजण निगेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नेमका कोणता अहवाल बरोबर याबाबत आता नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
गुरुवारी २५ जण आले होते पॉझिटिव्ह..
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजय कुमार भारती यांनी दिलेल्या माहितीनुसार, या महाविद्यालयातील ७५ विद्यार्थी आणि शिक्षकांची कोरोना तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये २५ जणांना या विषाणूची लागण झाल्याचे गुरुवारी समोर आले होते. यामध्ये तीन महिला शिक्षक, चार विद्यार्थिनी आणि १८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, असेही भारती यांनी सांगितले होते. मात्र, त्यानंतर आज (शुक्रवारी) दुपारी १२च्या सुमारास या सर्वांची पुन्हा तपासणी करण्यात आली, तर सर्वच्या सर्व निगेटिव्ह आढळून आले. डॉ. पुरुषोत्तम कुमार यांनी सांगितले, की हे कसे झाले याबाबत अद्याप आम्हालाही माहिती नाही. याबाबत आम्ही उपआरोग्य केंद्र प्रभारी डॉ. पॉल यांच्याकडून अहवाल मागवला आहे.
दोन्ही तपासण्या रॅपिड अँटीजेन..
गुरुवार आणि शुक्रवार दोन्ही दिवशी केल्या गेलेल्या चाचण्या या रॅपिड अँटिजेन चाचण्या होत्या. गुरुवारी २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती डॉ. पॉल यांनी आम्हाला दिली होती. त्यासोबतच, आज त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहितीही पॉल यांनीच आम्हाला दिली असल्याचे डॉ. भारती यांनी स्पष्ट केले.
लोकांच्या मनात संभ्रम..
काही प्रमाणात अहवाल चुकीचा असणे आपण समजू शकतो. मात्र, सर्वांचाच अहवाल चुकीचा येणे कसे शक्य आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गुरुवारी सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर बिहार सरकारच्या शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित केला गेला होता. त्यामुळे, याबाबत कोणीही प्रश्न उपस्थित करु नये यासाठी हा अहवाल बदलला गेला का? अशी चर्चाही आता नागरिकांमधून होत आहे.
हेही वाचा : बदायूं बलात्कार प्रकरण : चंद्रमुखी देवींच्या वक्तव्यावर प्रियांका गांधी भडकल्या