बंगळुरू : कर्नाटकच्या चमराजनगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गेल्या २४ तासांमध्ये तब्बल २४ कोरोना रुग्णांचा याठिकाणी बळी गेला आहे. यासाठी ऑक्सिजनच्या कमतरतेसह इतर गोष्टीही कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे. या २४ रुग्णांपैकी १२ रुग्णांचा ऑक्सिजन नसल्यामुळे मृत्यू झाल्याचे रुग्णालयातील सूत्रांनी सांगितले.
सध्या रुग्णालयातील ५०हून अधिक रुग्ण अतिदक्षता विभागात आहेत. या सर्वांनाही ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्रास होत असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, याबाबत माहिती मिळाल्यानंतर मुख्यमंत्री बी. एस. येदीयुरप्पा यांनी चमराजनगरचे जिल्हाधिकारी रवी यांची कानउघडणी केली आहे.
म्हैसूरवरुन येणार ५० सिलिंडर..
दरम्यान, खासदार प्रताप सिम्हा यांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हैसूरहून या रुग्णालयाला ५० ऑक्सिजन सिलिंडर देण्यात येणार आहेत. याबाबत आपण जिल्हाधिकाऱ्यांशी आणि ऑक्सिजन पुरवठा अधिकाऱ्याशी बोललो असल्याचे प्रताप यांनी फेसबुकवरुन सांगितले.
गेल्या दोन दिवसांमध्ये कर्नाटकमधील ही दुसरी अशी घटना आहे. शनिवारी (१ मे) देखील कलबुर्गीमधील के.बी.एन. रुग्णालयातील चार कोरोना रुग्णांचा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे मृत्यू झाला होता.
हेही वाचा : उत्तर प्रदेशमध्ये 6850 नविन कोरोनाबाधितांची नोंद