नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले असून परिस्थिती बिकट झाली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यू संख्येत वाढ झाली आहे. रुग्णालयापासून ते स्मशानभूमीपर्यंत सर्वत्र गर्दी दिसून येत आहे. कोरोना रुग्णांच्या मृतदेह दफन करण्यासाठी दिल्लीतील स्मशानभूमीमध्ये जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे गाजीपुर स्मशानभूमीमध्ये दोन ख्रीस्ती धर्मीय रुग्णांच्या मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.
भविष्यातील वाद टाळण्यासाठी अंत्यसंस्कार करण्यापूर्वी कुटुंबीयांकडून लिखित स्वरूपात पत्र घेण्यात आले आहे. तसेच राजीव गांधी सुपर स्पेशलिटी रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला होता. तेथूनही कागदपत्रे मागवण्यात आली. कुटुंबीयांची परवानगी मिळाल्यानंतर मृतदेहांवर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात आला, असे गाजीपूर स्मशानभूमीतील पुजारी सुशील यांनी सांगितले. दोन्ही रुग्णांच्या काही अस्थीचे यमुना नदीमध्ये विसर्जन करण्यात आले. तर काही अस्थींचे दफन करण्यात आले आहे.
कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची अहवेलना -
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णांचे बळी जात आहेत. ही संख्या एवढी आहे, की स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यासाठी जागाही शिल्लक राहत नाही. गंगेकिनारी वाळूतच मृतदेहांना दफन करत अंत्यविधी पार पाडत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. तर उत्तर प्रदेशमधील बल्लिया जिल्ह्यातील नरहरी ठाण्याजवळ सुहाव ब्लॉक अंतर्गत 60 जवळी डेरा गंगा घाटजवळ जवळपास 12 मृतदेह आढळले आहेत. शहरातून वाहणाऱ्या गंगा नदीच्या किनारी जवळपास ५० लोकांचे मृतदेह वाहून आल्याचे आढळून आले होते यांपैकी कित्येक मृतदेहांचे भटक्या कुत्र्यांनी लचकेही तोडल्याचे दिसून आले.
रुग्णांचा वाढता आलेख -
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत देशभरात 3,62,727 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. याखेरीज गेल्या 24 तासांत 4,120 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात निर्बंध लागू करण्यात आले असूनही नियमांचे पालन होत नसल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
हेही वाचा - उन्नावमध्ये गंगेकिनारी वाळूतच पुरले जातायत मृतदेह; आता त्यासाठीही जागा नाही शिल्लक