नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले असून मृत्यूच्या संख्येत वाढ होतच आहे. यातच कोरोना लस, ऑक्सिजन तुडवडा निर्माण झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षाच्या 12 नेत्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहले आहे. देशात कोरोना महामारी रोखण्यासाठी मुक्त लसीकरण मोहीम राबवणे, सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प स्थगित करणे आणि त्या पैशाचा कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी उपयोग करण्याची मागणी केली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन अशा देशातल्या एकूण 12 पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी संयुक्तपणे हे पत्र पाठवले आहे.
काय म्हटलंय पत्रात -
- सर्व बेरोजगारांना किमान ६ हजार रुपये प्रतिमहिना देण्यात यावा.
- कृषी कायदे रद्द करावे. जेणेकरून शेतकरी देशातील नागरिकांसाठी अन्नधान्याचं उत्पादन करू शकतील.
- गरजूंना मोफत अन्नधान्याचं वाटप करावं.
- सेंट्रल व्हिस्टा प्रकल्प थांबवावा. त्यासाठी वापरण्यात येणार निधी ऑक्सिजन आणि लसीसाठी वापरावा.
- लसीच्या उत्पादनासाठी सर्व स्त्रोतांचा वापर करण्यात यावा. देशांतर्गत आणि जागतिक या दोन्ही स्तरावरून लस मिळवावी.
- देशात मोफत लसीकरण मोहीम राबवण्यात यावी. प्रत्येकाला लस देण्यात यावी.
- देशात लस उत्पादनात गती आणावी. लसीसाठी ३५ हजार कोटींची तरतूद करावी.
- खासगी संस्थामधील आणि पंतप्रधान सहायतामधील निधीचा वापर लस खरेदी, ऑक्सिजन, औषधे आणि वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीसाठी करावा.
हेही वाचा - 'कोरोना व्हेरिएंटचा उल्लेख देशाच्या नाही तर वैज्ञानिक नावानेच करावा'; डब्ल्यूएचओची विनंती