विरोधात उमेदवार उभा करणार नाही; पण 'ही' अट पूर्ण करा - मराठा समाज आक्रमक - Lok Sabha Elections
Published : Apr 5, 2024, 5:33 PM IST
पुणे Maratha On Lok Sabha Election : पुणे लोकसभा निवडणूक ही तिरंगी होणार असून भाजपा, काँग्रेस तसेच वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवार हे जाहीर करण्यात आले आहे. असं असताना मराठा समाजाची भूमिका काय याबाबत आता चर्चा सुरू असताना समाजाने आपली आक्रमक भूमिका जाहीर केली आहे. पुणे लोकसभा निवडणूक मराठा समाजाच्या वतीनं लढविण्यात येणार नाही. तसेच तीन प्रमुख उमेदवारांपैकी अजूनही एकालाही पाठिंबा देण्यात आलेला नाही. उमेदवाराने तसेच त्यांच्या पक्षाने मराठा आरक्षणासाठी काय केलं, हे आधी जाहीर करावं. मगच समाज कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय घेईल. अन्यथा आमच्यासाठी नोटांचा पर्याय खुला असल्याचं परखड मत यावेळी समाजाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलं आहे.
'सकल मराठा समाज'चा कोणालाही पाठिंबा नाही: काही दिवसांपूर्वी मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात भूमिका घेत प्रत्येक ठिकाणी उमेदवार उतरवला. आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं आहे. पुण्यात देखील सकल मराठा समाजाच्या वतीनं भूमिका घेतली असून समाजाने पुण्यात अजूनही कोणालाही पाठिंबा जाहीर केलेला नाही.