केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान साई चरणी नतमस्तक; शेतकऱ्यांसाठी दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र - SHIVRAJ SINGH CHOUHAN
Published : Jan 2, 2025, 5:34 PM IST
शिर्डी : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंग चौहान (Shivraj Singh Chouhan) दरवर्षी एक जानेवारी रोजी सहपरिवार शिर्डीत येवून साईबाबांच्या समाधीचं दर्शन घेतात. मात्र, बुधवारी (1 जानेवारी) शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात दिल्लीत कॅबिनेट बैठक होती. त्यामुळं त्यांना दर्शनासाठी साई दरबारी येता आलं नाही. आज शिवराजसिंग चौहान यांनी सहपरिवार शिर्डीतील साईबाबांच्या माध्यान्ह आरतीला हजेरी लावली. साईंच्या दर्शनानंतर चौहान यांनी मंदिर परिसरात पत्रकार परिषद घेतली.
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलं पत्र : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी सुरुच राहील. त्याचबरोबर कांदा निर्यात मूल्य चाळीस टक्क्यांवर वीस टक्क्यांवर आणल्याची माहिती त्यांनी दिली. कांद्याचे भाव कमी झाले तर नाफेड आणि इतर संस्थाच्या माध्यमातून कांदा खरेदी केली जाईल. त्यामुळं कांदा उत्पादकांना त्याचा चांगला भाव मिळेल असाही निर्णय कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. तर दिल्लीतील शेतकऱ्यांना अनेक योजनेचा लाभ मिळत नव्हता. म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे, अशी माहिती शिवराजसिंग चौहान यांनी दिली.