"रोहित पवार ईडी चौकशीचा राजकीय इव्हेंट करताय", उमेश पाटलांची जोरदार टीका - ॲग्रो कारखाना प्रकरण
Published : Jan 25, 2024, 9:04 AM IST
सोलापूर Umesh Patil On Rohit Pawar : बारामती ॲग्रो कारखाना प्रकरणी राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार हे सध्या ईडीच्या रडारवर आहेत. दरम्यान, यावरुनच अजित पवार गटाचे राज्याचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, "एकीकडं रोहित पवार 'कर नाही तर डर कशाला' असं म्हणतात आणि दुसरीकडं, असं सांगतात की, ईडीवर कुणाचा तरी दबाव आहे. तसंच ते कार्यकर्त्यांसोबत ईडीच्या कार्यालयात जातात. ईडी चौकशी बाबत रोहित पवार पॉलिटिकल इव्हेंट सारखं चित्र निर्माण करत आहेत. त्यांनी जर चुकीचं काम केलं नसेल, तर काहीच होणार नाही. रोहित पवार हे जर क्लिन असतील तर त्यांना क्लिन चीट मिळेल, मग घाबरता कशाला?", असा सवाल उमेश पाटील यांनी केला आहे. तसंच राज्यातील अनेक उद्योजकांच्या, व्यापाऱ्यांच्या, राजकीय पदाधिकाऱ्यांच्या वेगवेगळ्या चौकशा होतंच रहातात. त्याला राजकीय रंग देऊ नका, असा सल्लाही उमेश पाटलांनी रोहित पवारांना दिला आहे.