मिलिटरी इंटेलिजन्समधील हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली, देशातील पहिले 'सतर्क हिरोज पार्क', पाहा व्हिडिओ - Pune Satark Park
Published : Oct 6, 2024, 10:48 AM IST
पुणे : देशाची सेवा करताना प्राणाची आहुती देणाऱ्या 'मिलिटरी इंटेलिजन्स' (MI) जवानांच्या बलिदानाचा सन्मान करण्यासाठी पुणे कॅन्टोन्मेंट येथील वानवडी येथे वीरमरण आलेल्या 40 जवानांची आणि त्यांनी केलेल्या देशसेवाची माहिती देणारं देशातील पहिलं 'सतर्क हिरोज पार्क' (Satark Park) सुरू करण्यात आलं. लेफ्टनंट जनरल प्रदीप कुमार चहल यांच्याहस्ते शनिवारी (5 ऑक्टोबर) या पार्कचं उद्घाटन करण्यात आलं. या स्मारकामध्ये अनेक सन्मानित सैन्यदलातील गुप्तचर कर्मचाऱ्यांचे पुतळे आणि त्यांच्या योगदानाबद्दल माहिती देण्यात आलीय. सर्वसामान्य नागरिकांना या स्मारकातून या शूरवीरांच्या न ऐकलेल्या कथा पाहायला मिळणार आहेत.
40 शूरवीरांचे स्मारक : रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा लिमिटेड (RSIIL) च्या सहकार्यानं मिलिटरी इंटेलिजेंस ट्रेनिंग स्कूल आणि डेपो (MITSD) द्वारे हे स्मारक बनविण्यात आलं. या उद्यानात कीर्ती चक्र पुरस्कार विजेते नाईक प्रताप सिंग (12 जून 1977) आणि ब्रिगेडियर रवी दत्त मेहता (7 जुलै 2008), शौर्य चक्र पुरस्कार विजेते शिपाई ओम शिव शर्मा (5 सप्टेंबर 1994), नाईक जंगबीर सिंग (12 जून 1977) अश्या एकूण 40 शूरवीरांचे स्मारक बनवून त्यांच्या विषयी माहिती देण्यात आली आहे.