पोलीस ठाण्यात गोळीबार म्हणजे स्वार्थासाठी महायुतीत गँगवार - संजय राऊत - गणपत गायकवाड
Published : Feb 3, 2024, 10:56 PM IST
ठाणे Sanjay Raut News : भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर शुक्रवारी (2 फेब्रुवारी) रात्री पोलीस ठाण्यातच गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेवरुन टीका करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "सत्तास्थानी असलेल्या शिवसेना (शिंदे गट), भाजपा नेत्यांना जनतेचे प्रश्न, सामाजिक प्रश्नांचे काही पडलेलं नाही. ही मंडळी खंडणी, लुटमार, जमिनींचे व्यवहार, व्यवहारांमधील हिस्से यामध्ये मग्न आहेत. यामधूनच उल्हासनगर मधील गँगवारची घटना घडली आहे. हा सगळा स्वार्थींचा खेळ आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जिल्ह्यात, त्यांचे बाळराजे सुपुत्र खासदार यांच्या मतदारसंघात शिवसेना-भाजपाच्या दोन पदाधिकाऱ्यांमध्ये पोलीस ठाण्यात अंदाधुंद गोळीबार होतो. हे चित्र संपूर्ण देशाचे, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांनी पाहिले. याच मंडळींनी मोठ्या हिमतीनं जे खोक्यांचं राज्य निर्माण केलंय तेथे चाललंय काय? असा प्रश्न उल्हासनगरमधील गोळीबाराची घटना पाहून देश करत आहे. भाजपाचा आमदार मुख्यमंत्री शिंदेंच्या निकटवर्तीय असलेल्या पदाधिकाऱ्यावर अंदाधुंद गोळीबार करतो म्हणजे महायुतीत गँगवार सुरू असल्याचं हे उत्तम उदाहरण आहे, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.