तुळशीबागेत राम मंदिरात २६३ वा श्रीरामजन्म सोहळा थाटात, जय श्रीरामच्या घोषणांनी दुमदुमला मंदिर परिसर - Ram Navami in Tulsibaug - RAM NAVAMI IN TULSIBAUG
Published : Apr 17, 2024, 5:46 PM IST
पुणे Ram Navami in Tulsibaug : कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे... असे पाळण्याचे मंगल स्वर ऐतिहासिक तुळशीबाग राम मंदिरात निनादले. पुणे प्रांताचे सरसुभेदार श्रीमंत नारो अप्पाजी तुळशीबागवाले यांनी १७६१ साली स्थापन केलेल्या देखण्या मंदिरामध्ये फुलांनी सजवलेल्या सभामंडपात २६३वा श्रीरामजन्म सोहळा थाटात साजरा करण्यात आला.
श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक आणि कीर्तन : श्री रामजी संस्थान तुळशीबागच्यावतीनं श्रीराम जन्मोत्सवानिमित्त तुळशीबाग येथील श्रीराम मंदिरात सकाळी श्रीरामाची मुख्य पूजा पार पडली. मंदिर परिसरात सकाळी ११ वाजता श्रीरामांच्या पोषाखाची मिरवणूक काढण्यात आली. ह.भ.प. दर्शन बुवा वझे यांचे श्रीरामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर श्रीरामजन्माचा मुख्य सोहळा दुपारी १२.४० वाजता साजरा झाला.
पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे स्वागत : श्रीराम जन्मानंतर मिळणारा श्रीरामाच्या वस्त्राचा 'पागोट्याचा प्रसाद' घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. तर, सायंकाळी श्रीरामांच्या छबिन्याची मिरवणूक काढण्यात आली. चौकाचौकात पुणेकरांकडून पुष्पवृष्टीने मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. संस्थानचे कार्यकारी विश्वस्त राघवेंद्र उर्फ सुहास तुळशीबागवाले, विश्वस्त भरत तुळशीबागवाले, डॉ. रामचंद्र तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले, रामदास तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवाराने उत्सवाचे आयोजन केले आहे.