डॉ. अजय तावरे राहत असलेल्या सोसायटीतील नागरिक आक्रमक; म्हणाले, इथं राहायची लाज.... - Pune Hit And Run Case
Published : May 28, 2024, 10:52 PM IST
पुणे Pune Hit And Run Case : कल्याणी नगर अपघात प्रकरणी अजून एक मोठी बातमी समोर आली आहे. त्या अल्पवयीन मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी ससून हॉस्पिटलमधील डॉक्टर अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर आणि अतुल घटकांबळे यांना सोमवारी पुणे पोलिसांनी अटक केली. यानंतर आता तावरे राहत असलेल्या पुण्यातील गीता सोसायटीतील सोसायटी धारक हे देखील आक्रमक झाले आहे. सोसायटीधारकांनी तावरे यांच्याबाबतचे पाढेच वाचून दाखवले. डॉ. अजय तावरे हे गीता सोसायटीचे चेअरमन असून, त्यांच्या चेअरमन पदाच्या राजीनाम्याची मागणी यावेळी सोसायटी धारकांनी केली आहे.
समितीकडून चौकशी : ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी वैद्यकीय विभागाने नेमलेली त्रीसदस्यीय समितीकडून ससून रुग्णालयात आज दिवसभर चौकशी करून या समितीने गुन्हे शाखेत देखील भेट दिली. यावेळी चौकशी समितीच्या डॉ. पल्लवी सापळे म्हणाल्या की, आज दिवसभर ससून हॉस्पिटलमध्ये जाऊन आम्ही घडलेल्या घटनेची माहिती घेतली आहे. आम्ही आमचं जे काही निकष आहे, ते शासनाच्या समोर मांडणार आहोत. तसेच लवकरच आम्ही आमचे रिपोर्ट सादर करणार आहेत.