मनमाड शहर हादरलं! धारदार शस्त्रानं वार करून माजी नगरसेवकाच्या मुलाची हत्या - Manmad Crime News - MANMAD CRIME NEWS
Published : Aug 4, 2024, 8:28 PM IST
मनमाड : माजी नगरसेवकाच्या मुलावर जुन्या वादातून हल्ला केल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याच्या घटनेनं मनमाड शहर हादरलं आहे. जुन्या भांडणाच्या कुरापतीतून टोळक्यानं माजी नगरसेवकाच्या मुलाची हत्या केली. शुभम देविदास पगारे (वय 27) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. शनिवारी रात्री घरी जात असताना शुभमवर शहरातील स्टेडियम जवळील परिसरात हल्ला झाला. धारदार शस्त्रानं त्याच्यावर वार करण्यात आले. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळं संतप्त झालेल्या नातेवाईक आणि परिसरातील नागरिकांनी पोलीस स्टेशनवर आंदोलन करत आरोपींना अटक करण्याची मागणी केली. शहरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.