"मला न्याय मिळाला"; राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यावर काय म्हणाल्या खासदार मेधा कुलकर्णी?
Published : Feb 21, 2024, 1:08 PM IST
पुणे MP Medha Kulkarni : राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातून 6 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यात आले होते. त्या सर्व 6 जागांवरील उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात पुण्यातून माजी आमदार मेधा कुलकर्णी यांना भाजपानं उमेदवारी जाहीर केली होती. त्यांचीही आता बिनविरोध निवड झाली असून यानंतर त्यांनी 'ईटीव्ही भारत'शी संवाद साधलाय. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की, "खूप वर्ष विविध स्तरावर पुण्यासाठी काम केलंय. आता नवीन संधी, नवीन आयाम हा मिळालंय. याही पातळीवर माझ्यासाठी पक्षानं जे काम नेमलं असेल ते मी करणार आहे. पुण्यातील मेट्रो, नवीन एअरपोर्ट तसंच शहरातील वाहतुकीचे प्रश्न, हे मुद्दे समोर असणार आहेत. केंद्राकडून वेळोवेळी पुणे शहरासाठी निधी आलेला आहे. भविष्यात पुण्यासाठी जे जे योग्य असेल त्यासाठी प्रयत्न करणार आहे." तसंच आगामी लोकसभा बाबत त्यांना विचारलं असता, पुणे लोकसभेसाठी भाजपाचाच उमेदवार जिंकून येणार आहे. लोकसभेसाठी इच्छुक असणाऱ्यांमध्ये कोणीही नाराज नसल्याचं यावेळी कुलकर्णी यांनी सांगितलंय. तुमची निवड झाल्यानं कोथरुडकरांना न्याय मिळाला का अस विचारलं असता, तो त्यांना विचारण्याचा प्रश्न आहे. पण मला न्याय मिळाल्याचं यावेळी कुलकर्णी यांनी सांगितलंय.