कार्यकर्ते म्हणतात हाती तुतारी घ्या, नेमकं राजेंद्र शिंगणे यांच्या मनात चाललंय तरी काय!
Published : Oct 16, 2024, 10:21 PM IST
बुलढाणा : विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू झालीय. महाराष्ट्रात निवडणुकांची घोषणा झाली असून राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आला आहे. तसंच बुलढाण्यात मोठ्या घडामोडी होण्यास सुरुवात झाली आहे. सिंदखेडराजा मतदारसंघातून सध्या अजितदादा पवार गटात असलेले माजी आमदार मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी आज सिंदखेडराजा येथील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर एक मोठं विधान केलं आहे. मला बुलढाणा केंद्रीय बँकेकरता अजितदादांनी मदतीचा शब्द दिला होता आणि त्याकरता मी उघडपणे त्यांच्यासोबत गेला होतो. त्यांनी मला मदत देखील केली. पण सध्या कार्यकर्त्यांची जनभावना अशी आहे की, मी शरद पवार यांच्यासोबत हातात तुतारी घ्यावी. यासाठी मला लोक विचार करण्यास भाग पाडत आहेत. यावरुन येणाऱ्या काळात मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आमदार आणि माजी मंत्री राजेंद्र शिंगणे दिसत आहे. त्यामुळं जिल्ह्यात एक मोठं वादळ निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.