पुण्यात 'बंडोबां'नी वाढवली महाविकास आघाडीची डोकेदुखी; कसबा पेठ, पर्वतीसह शिवाजीनगरमध्ये थोपटलं दंड
Published : Nov 1, 2024, 11:10 AM IST
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनी उमेदवारी अर्जसुद्धा दाखल केलाय. मात्र, पुणे शहरातील काही विधानसभा मतदारसंघात (Maharashtra Assembly Election 2024) काँग्रेस तसंच राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये (शरदचंद्र पवार) बंडखोरी झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीपुढं पक्षातील नेत्यांनीच आव्हान निर्माण केल्याचं चित्र आहे. कसबा, पर्वती आणि शिवाजीनगर मतदारसंघात काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज भरल्यानं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे. बंड केलेल्या नेत्यांकडून "आमच्यावर अन्याय झाला असून आम्ही लढणारच" असं सांगितलं जातंय. पुण्यातील कसबा मतदार संघातून माजी महापौर कमल व्यवहारे, मुख्तार शेख यांनी तर पर्वती मतदार संघातून आबा बागुल, सचिन तावरे यांनी आणि शिवाजीनगर मतदार संघातून मनीष आनंद यांनी बंड पुकारलं आहे.