साताऱ्यातील विलासपूरमध्ये बिबट्याचा थरार, भरवस्तीत घुसून पळवलं कुत्र्याचं पिल्लू, पाहा व्हिडिओ - LEOPARD NEWS
Published : Dec 25, 2024, 3:36 PM IST
सातारा : साताऱ्यातील विलासपूरमध्ये एका कॉलनीत घुसून बिबट्यानं कुत्र्याचं पिल्लू पळवून नेल्याची घटना सोमवारी (२३ डिसेंबर) रात्री घडली. हा संपूर्ण थरार एका बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. तीन लोकांसमोर ही घटना घडली. कुत्र्याची दोन पिल्लं रस्त्यावर होती. त्यावेळी एक तरुणी घराबाहेर फिरत होती तर एक दाम्पत्य दुचाकीवरून कॉलनीत येत होतं. त्यांच्या समोरच बिबट्यानं कुत्र्याच्या एका पिल्लाला पळवून नेलं. अजिंक्यतारा किल्ला परिसरातून जंगली प्राणी आता थेट मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांची शिकार करू लागले आहेत. त्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. मागील आठवड्यात तीन तरस माची पेठेतील मानवी वस्तीत शिरले होते. सातारा वन विभागाला या घटनेची माहिती देण्यात आली आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी सापळा लावण्याची मागणी विलासपूर ग्रामस्थांनी केली आहे.