नारायण राणे आणि रामदास कदम वादात प्रमोद सावंतांची उडी; "रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मावळ, रायगडमध्येही फुलणार कमळ" - वादात प्रमोद सावंतांची उडी
Published : Mar 3, 2024, 2:31 PM IST
रत्नागिरी Pramod Sawant On Lok Sabha Election: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघावरुन रामदास कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यात मोठा वाद सुरू आहे. या वादात आता गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उडी घेतली आहे. "रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघात भाजपाचा उमेदवार असावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांची ही मागणी वरीष्ठ पातळीवर पोहोचवण्याचं काम आपण करणार आहोत," असं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलं आहे. ते आज रत्नागिरीत बोलत होते. आज सकाळी प्रमोद सावंत यांनी रत्नागिरी जिल्हा विशेष कारागृहात स्वातंत्र्यवीर सावरकरांना ज्या कोठडीत ठेवण्यात आलं होतं, त्या कोठडीला भेट देत त्यांनी अभिवादन केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
यावेळी प्रमोद सावंत म्हणाले की, "कार्यकर्त्यांची ईच्छा आहे की, रायगड , रत्नागिरी - सिंधुदूर्ग आणि मावळ लोकसभा मतदार संघात भाजपाचाच उमेदवार असावा. दरम्यान सर्व पक्ष संपवून भाजपलाच जीवंत रहायचं आहे का ? या रामदास कदम यांच्या टिकीवर बोलणं मात्र टाळलं. "कुणी काय आरोप केले, याकडं मी जात नाही, मी एनडीएचा आणि भाजपाचा प्रचार करायला आलोय. तसेच भाजपची दुसरी यादी जाहीर होईल, अजून त्यांची मिटींग झालेली नाही," असं देखील ते यावेळी म्हणाले. "फिर एक बार मोदी सरकार, अबकी बार 400 पार हे ब्रीद वाक्य घेऊन भाजपाचा कन्याकुमारीपासून ते कश्मीरपर्यंत प्रवास सुरू आहे. मी स्वतः महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा अशा राज्यात प्रवास करत आहे. लोकांचा उत्साह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील त्यांचं प्रेम पाहता फिर एक बार मोदी सरकारच येणार," असा विश्वास गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला आहे.