गिरीश महाजन यांनी बजावला मतदानाचा हक्क ; म्हणाले, 'पैसे वाटप प्रकरणाशी विनोद तावडेंचा संबंध नाही, देवेंद्र फडणवीसांनी . . . '
Published : 4 hours ago
जळगाव : जामनेर मतदार संघाचे भाजपाचे उमेदवार गिरीश महाजन यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत विधानसभा निवडणूक 2024 मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. यंदा राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार येणार आहे. तर माझा या मतदारसंघांमध्ये गेल्या वेळेपेक्षाही विक्रमी मताधिक्यानं विजय होईल, असा विश्वास गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे.
विरोधकांनी भाजपावर पैसे वाटपाचा आरोप केला. या प्रकरणी बोलताना गिरीश महाजन म्हणाले की, "महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे असो नाना पटोले असो संजय राऊत असो की, सुप्रिया सुळे यांना सकाळी सकाळी भाजपाचं नाव घेतल्याशिवाय चहा आणि नाश्ता घशाचा खाली उतरत नाही. त्यामुळे उठता बसता काही झालं तरी त्यांना भाजपा दिसते, ही वस्तुस्थिती आहे. विनोद तावडे यांचा पैसे वाटपाशी काही संबंध नव्हता, त्याबाबतचा खुलासा त्यांनी केलेला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा त्याबाबतचा खुलासा केलेला आहे. त्यामुळे त्या पैसे वाटप प्रकरणाशी विनोद तावडे यांचा कुठलाही संबंध नव्हता."