" 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल, तर महायुतीतून बाहेर पडावं", बाळासाहेब थोरातांचा अजित पवारांना सल्ला - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024
Published : Nov 16, 2024, 3:13 PM IST
शिर्डी : राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधुम सुरू आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सभा सुरू आहेत. महायुतीचे स्टार प्रचारक उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारसभेत बोलताना 'बटेंगे तो कटेंगे'चा नारा दिला होता. त्यानंतर महायुतीमधून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घोषणेचा विरोध केल्याचं दिसून आलं. आता यावरून काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी अजित पवारांना महायुतीतून बाहेर पडण्याचा सल्ला दिला." 'बटेंगे तो कटेंगे' या विधानाशी अजित पवार सहमत नसतील, तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं. व्होट जिहाद हा शब्द भाजपानं काढलाय. लोकसभेला कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी देखील आम्हाला मतदान केलं. मग त्याला कांदा जिहाद म्हणणार का?" असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलाय. आज काँग्रसेच्या सरचिटणीस प्रियंका गांधी महाराष्ट्र दौर्यावर असून शिर्डीतून त्या आपल्या दौर्याची सुरुवात करणार आहेत. प्रियंका गांधी यांच्या स्वागतासाठी बाळासाहेब थोरात शिर्डी विमानतळावर पोहचल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना महायुतीवर जोरदार निशाणा साधला.