'या' दोन जिल्ह्यातील प्रति पंढरपूर मंदिरात आषाढी एकादशी साजरी; विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी - Ashadhi Ekadashi 2024
Published : Jul 17, 2024, 10:18 PM IST
मुंबई Ashadhi Ekadashi 2024 : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या (Vitthal Rukmini) दर्शनासाठी आज देशभरातून लाखो भाविकांनी हजेरी लावली होती. टाळ, मृदंग आणि विठू माऊलीच्या गजरात आज उभी पंढरी न्हाऊन निघली होती. पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीची महापूजा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सपत्नीक केली. अशाच पद्धतीने दोन जिल्ह्यातील "प्रति पंढरपूर" (Prati Pandharpur) येथे देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मुंबईतील वडाळा येथील विठ्ठल मंदिर प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते. वडाळा येथील विठ्ठल मंदिरामध्ये आज आषाढी एकादशीनिमित्त सकाळपासूनच विठ्ठल-रखुमाईच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील प्रति पंढरपूर "नंदवाळ" येथे देखील आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.