आयपीएलच्या धर्तीवर आता 'महिला महाराष्ट्र प्रिमीयर लीग'ची घोषणा; रोहित पवार म्हणाले, "मैलाचा दगड..." - womens maharashtra premier league - WOMENS MAHARASHTRA PREMIER LEAGUE
Published : Apr 7, 2024, 11:00 PM IST
पुणे Womens Maharashtra Premier League : गेल्या वर्षी (2023) महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटना (MCA) ने आता महिलांसाठी महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेची घोषणा केली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) मान्यतेखाली या स्पर्धेचं येत्या 24 जून 2024 पासून गहुंजे येथील एमसीए स्टेडियम येथे आयोजन करण्यात आलं आहे. तर डब्लूएमपीएल या स्पर्धेमुळं महिला क्रिकेटमधील एक मैलाचा दगड गाठला जाणार असल्याची प्रतिक्रिया एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दिली आहे. महिला क्रिकेटच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून महाराष्ट्रातील गुणवान महिला क्रिकेटपटूंना या स्पर्धेमुळं आदर्श व्यासपीठ मिळणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, यंदाच्या डब्लूएमपीएल स्पर्धेत एमसीएच्या कार्यकक्षेतील चार शहरांचे प्रतिनिधीत्व करणारे चार संघ सहभागी होणार आहेत. राउंड रॉबिन पद्धतीनं होणाऱ्या या स्पर्धेत प्रत्येक संघ सहा साखळी सामने खेळणार असून सर्वोत्तम दोन संघ अंतिम लढतीसाठी पात्र ठरणार आहे.