हैदराबाद :तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राणीपेट येथे प्रमुख ऑटोमोबाईल उत्पादक कंपनी टाटा मोटर्सच्या नवीन उत्पादन कारखान्याची पायाभरणी केली. या प्लांटवर 9 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. चेन्नईपासून 115 किमी अंतरावर असलेल्या या जिल्ह्यातील पनपक्कम येथे या प्रकल्पाचा भूमीपूजन समारंभ पार पडला. या कारखान्यामुळं पाच हजार नवीन रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. 'मेक इन इंडिया, फॉर द वर्ल्ड'ला प्रोत्साहन देण्याचं कंपनीचं उद्दिष्ट आहे.
काय म्हणाले स्टॅलिन? :यावेळी बोलताना स्टॅलिन म्हणाले, 'तामिळनाडू हे केवळ भारतात कार्यरत असलेल्या मोठ्या कंपन्यांसाठीच नव्हे, तर बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठीही पहिलं गुंतवणुकीचं ठिकाण आहे. या कार्यक्रमात टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांच्या उपस्थितीमुळं आम्हाला आनंद झाला आहे. नमक्कल जिल्ह्यातील रहिवासी असलेले आणि जागतिक स्तरावर नावाजलेल्या कंपनीचं नेतृत्व करणारं चंद्रशेखरन ही राज्यासाठी अभिमानाची बाब आहे.
अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान : टाटा मोटर्सनं हा प्लांट उभारण्यासाठी मार्चमध्ये सरकारसोबत सामंजस्य करार केला होता. यावेळी टाटा मोटर्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले, 'आम्हाला पुढच्या जनरेशनच्या कार निर्मितीसाठी पानपक्कमला आल्याचा आनंद होत आहे.''यामध्ये इलेक्ट्रिक आणि लक्झरी वाहनांचाही समावेश आहे.तामिळनाडू हे प्रमुख औद्योगिक राज्य आहे. त्यात प्रगतीशील धोरणं आणि स्थापित ऑटोमोटिव्ह हब आहे. 'येथे कुशल आणि हुशार कर्मचारी आहेत. टाटा समूहाच्या अनेक कंपन्या येथून यशस्वीपणे काम करत आहेत. आता आम्ही येथे आमचा आधुनिक वाहन निर्मिती कारखाना उभारणार आहोत. आम्ही अत्याधुनिक उत्पादन तंत्रज्ञान आणि जागतिक दर्जाच्या शाश्वत पद्धतींचा वापर करू, असं चंद्रशेखरन म्हणाले.
'महिला सबलीकरणावर आमचा भर आहे. त्या अनुषंगानं सर्व स्तरांवर अधिकाधिक महिला कर्मचारी असाव्यात हा आमचा प्रयत्न असेल.' - एन. चंद्रशेखरन, अध्यक्ष टाटा मोटर्स
100 टक्के अक्षय ऊर्जेवर चालणार प्लांट :टाटा मोटर्स समूह या प्लांटमध्ये सुमारे 9 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. या प्लांटमध्ये दरवर्षी 2 लाख 50 हजारांपेक्षा जास्त वाहनं तयार करता येणार आहे. सुरुवातीला, कमी वाहनं तयार होतील, परंतु पुढील 5-7 वर्षांत ही संख्या अडीच लाखांपर्यंत वाढेल. हा प्लांट 100 टक्के अक्षय ऊर्जेवर चालणार आहे.