नवी दिल्ली PM Modi On AI :मंगळवारी इंडिया मोबाइल काँग्रेस 2024 चं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक मानकं तयार करण्याचं आवाहन केलंय. आपल्या उद्घाटन भाषणात, मोदींनी उद्योगातील तंत्रज्ञान, संशोधक आणि स्टार्टअप्सना AI आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक मानकं तयार करण्यास सांगितलंय.
AI साठी जागतिक मानकं : "AI आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक मानकं तयार करून विविध देशांच्या विविधतेचा देखील आदर केला पाहिजे,"असं पंतप्रधान म्हणाले. आमच्याकडं विमान वाहतूक क्षेत्रासाठी जागतिक मानदंड आहे. त्यामुळं आम्हाला डिजिटल क्षेत्रासाठी समान फ्रेमवर्कची आवश्यकता आहे." ज्याप्रमाणे आम्ही विमान वाहतूक क्षेत्रासाठी एका मापडंत तयार केलंय, त्याचप्रमाणे डिजिटल क्षेत्रात देखील अशीच नियमांची आवश्यकता, असल्याचं पंतप्रधान म्हणाले.
राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण :पीएम मोदींनी वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन स्टँडर्डायझेशन असेंबली (WTSA) ला यावर काम करण्यास सांगितलंय. विविध देशांच्या विविधतेचा आदर करण्यासाठी नैतिक एआय आणि डेटा गोपनीयतेसाठी जागतिक नियम तयार करावे, असं मोदी म्हणाले. "WTSA च्या प्रत्येक सदस्यानं दूरसंचार सुरक्षित कसं बनवू शकतो, यावर विचार करण्याची गरज आहे. भारताचा डेटा संरक्षण कायदा आणि राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण सुरक्षित करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं मोदी यांनी यावेळी बोलताना म्हटलं आहे.