मुंबई - National Science Day 2024 : राष्ट्रीय विज्ञान दिन 28 फेब्रुवारी रोजी देशात साजरा केला जातो. या दिवशी सर सीव्ही रमण यांनी 'रमण इफेक्ट'चा शोध लावल्याची घोषणा केली, यासाठी त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. महान भारतीय शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांनी रमन इफेक्टचा शोध लावल्याच्या स्मरणार्थ दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. या वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन 2024 ची थीम 'विकसित भारतासाठी भारतीय स्वदेशी तंत्रज्ञान' अशी निश्चित करण्यात आली आहे. या दिवसाचा उद्देश विद्यार्थ्यांना विज्ञानाकडे प्रेरित करणे आहे. याशिवाय सर्वसामान्यांना विज्ञान आणि वैज्ञानिक कामगिरीची जाणीव करून देणाचा आहे.
थीमबद्दलची घोषणा : राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त देशभरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये अनेक प्रकारच्या स्पर्धा आणि कार्यक्रमांचे आयोजन केले जाते, जेणेकरून मुलांमध्ये वैज्ञानिक वृत्ती विकसित होऊन त्यांची विज्ञानाबद्दलची आवड वाढेल. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त शाळा आणि महाविद्यालयांमध्ये प्रश्नमंजुषा आयोजित केली जाते. सी.व्ही.रमण यांच्यासह देशातील महान वैज्ञानिकांचे या दिवशी स्मरण केले जाते. भारत सरकार शास्त्रज्ञांना त्यांच्या प्रशंसनीय कार्यासाठी यादिवशी सन्मानित करतात. 'विकसित भारतासाठी स्वदेशी तंत्रज्ञान' थीमबद्दलची घोषणा केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी केली आहे. या दिवशी युवक आणि विद्यार्थ्यांनी विज्ञान क्षेत्रात पुढं यावं यासाठी योजना जाहीर देखील केल्या जाते.
सीव्ही रमणचा प्रवास : दरम्यान सीव्ही रमण यांचे पूर्ण नाव चंद्रशेखर वेंकट रमन होतं. त्याचा जन्म 7 नोव्हेंबर 1888 रोजी तिरुचिलापल्ली, तमिळनाडू येथे झाला होता. त्यांचे वडील गणित आणि भौतिकशास्त्राचे लेक्चरर होते. सीव्ही रमण यांनी विशाखापट्टणम येथील सेंट अलॉयसियस अँग्लो-इंडियन हायस्कूल आणि मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये शिक्षण घेतलं. 1907 मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजमधून त्यांनी एम.एस्सी केले. त्यांना मद्रास विद्यापीठात भौतिकशास्त्रात सुवर्णपदक मिळाले. 1907 ते 1933 दरम्यान त्यांनी कोलकाता येथील इंडियन असोसिएशन 'फॉर द कल्टिव्हेशन ऑफ सायन्स'मध्ये काम केलं. यादरम्यान त्यांनी भौतिकशास्त्राशी संबंधित अनेक विषयांवर संशोधन केलं.
रमन इफेक्ट : सी.व्ही.रामन यांच्या उत्तम शोध रमण इफेक्टबद्दल जाणून घेणे महत्त्वाचे आहे. एकदा ते लंडनहून भारतात येत असताना समुद्राचे निळे पाणी पाहून त्याच्या मनात कुतूहल निर्माण झाले की हे पाणी निळे का आहे. त्यांनी भारतात येऊन यावर संशोधन केलं. पारदर्शक पदार्थातून जाताना प्रकाश किरणांमध्ये होणारा बदल म्हणजेच 'रमण इफेक्ट' आहे. प्रकाशाची किरणे जेव्हा वेगवेगळ्या वस्तूंवर आदळतात आणि त्यांच्यातून जातात तेव्हा लहरींवर काय परिणाम होतो आणि विखुरल्यानंतर त्यांचा वेग काय असतो, हे सर्व त्याच्या शोधामध्ये सांगितलं गेलं आहे. रमण इफेक्टचा शोध आज जगभर वापरला जात आहे. सी.व्ही.रमण यांना 1954 मध्ये भारत सरकारनं भारतरत्न सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला आहे. याशिवाय ते भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळवणारे आशियातील पहिले शास्त्रज्ञ ठरले आहेत. सी.व्ही.रामन यांनी निवृत्तीनंतर बंगळुरूमध्ये रमण संशोधन संस्था स्थापन केली. 1947मध्ये इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे (IISc) संचालक झाले. त्याचं निधन 21 नोव्हेंबर 1970 रोजी झालं. विज्ञानाचे दैनंदिन जीवनात खूप महत्त्व आहे, याची जाणीव प्रत्येकाला असणे अत्यंत आवश्यक आहे.
हेही वाचा :
- रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लानं त्याच्या मुलींचे गोंडस फोटो केले शेअर
- ट्रेलर रिलीजपूर्वी नव्या पोस्टरसह सिद्धार्थने वाढवली 'योद्धा'ची उत्सुकता
- रजनीकांत आणि साजिद नाडियादवाला एका अविस्मरणीय चित्रपट प्रवासासाठी एकत्र