हैदराबादISRO SpaDex Mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) आज श्रीहरिकोटा येथून स्पॅडेक्स मिशनचं प्रक्षेपण करणार आहे. रात्री 10 वाजता स्पॅडेक्स मिशनचं प्रक्षेपण होणार आहे. इस्रोनं सोशल मीडिया पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे. इस्रोच्या या मोहिमेचे यश भारतीय अंतराळ स्थानक (BAS) आणि चांद्रयान-4 मोहिमेचे यश ठरवेल, असा विश्वास आहे. त्यामुळे हे प्रक्षेपण अत्यंत महत्त्वाचं मानलं जात आहे.
स्पॅडेक्स मिशन काय आहे ? : या मोहिमेत दोन उपग्रह आहेत. दोन्ही उपग्रहांचं वजन सुमारे २२० किलो असेल. त्यापैकी एक चेझर असेल आणि एक उपग्रह लक्ष्य असेल. या मोहिमेचं मुख्य लक्ष्य डॉकिंग आणि अनडॉकिंग करणे आहे. अंतराळ डॉकिंग प्रयोग जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात केला जाईल. हा प्रयोग पृथ्वीपासून सुमारे ४७० किमी अंतरावर असेल. प्रयोग यशस्वी झाल्यानंतर, दोन्ही उपग्रह दोन वर्षे पृथ्वीभोवती फिरतील. उपग्रह चेझरमध्ये कॅमेरा आहे. तर उपग्रह लक्ष्यात दोन पेलोड आहेत. या प्रयोगामुळं भविष्यात इस्रोला कक्षेतून बाहेर पडल्यानंतर वेगळ्या दिशेने जाणारा भाग पुन्हा कक्षेत आणण्याचे तंत्रज्ञान मिळणार आहे. याशिवाय कक्षेत सर्व्हिसिंग आणि इंधन भरण्याचा पर्यायही खुला होणार आहे. स्पेसेक्स मिशनमध्ये दोन भिन्न अंतराळयान अंतराळात एकमेकांशी जोडलेले दाखवले जातील.
डॉकिंग तंत्रज्ञान म्हणजे काय? : इस्रोच्या या मोहिमेचा उद्देश अंतराळात डॉकिंग-अनडॉकिंग तंत्रज्ञानाचं यशस्वीपणे प्रात्यक्षिक करणं आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर, दोन्ही उपग्रह अंतराळात या तंत्रज्ञानाद्वारे एकमेकांशी जोडले जातील. याला डॉकिंग म्हणतात. त्यानंतर, दोन्ही उपग्रह अंतराळात वेगळे होतील. याला अनडॉकिंग म्हणतात. इस्रोनं हे अभियान पूर्ण केले, तर भारत असं करणारा चौथा देश बनेल. दोन्ही उपग्रह ताशी २८ हजार किमी वेगानं अवकाशात प्रवास करतील. दोन्ही उपग्रहांना या वेगानं जोडावे लागेल आणि वेगळं करावं लागेल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही प्रक्रिया टक्कर न होता पूर्ण करावी लागेल.