वॉशिंग्टन Shakti fabrication plant :भारत आणि अमेरिका 'शक्ती' नावाचा एक नवीन सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट स्थापन करणार आहे. जो राष्ट्रीय सुरक्षेसाठी समर्पित जगातील पहिल्या बहु-मटेरियल फॅबपैकी एक असेल. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा, दूरसंचार आणि हरित ऊर्जा अनुप्रयोगांसाठी प्रगत सेन्सिंग, कम्युनिकेशन आणि पॉवर इलेक्ट्रॉनिक्सवर लक्ष केंद्रित केलंय.
सेमी कंडक्टर युनिट्सला मान्यता :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी न्यूयॉर्कमध्ये भारतीय-अमेरिकन नागरिकांच्या मेळाव्याला संबोधित करताना येत्या काळात तुम्हाला अमेरिकेतही मेड इन इंडिया चिप्स पाहायला मिळतील', असं सांगितलं. सेमीकंडक्टर क्षेत्रातील भारताच्या वाढत्या उत्पादन क्षमतेबद्दल मोदी बोलत होते. भारतानं आतापर्यंत पाच सेमी कंडक्टर युनिट्सला मान्यता दिली आहे. त्यापैकी 2 वर काम सुरू झालं आहे.
सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारणार :भारत आपला पहिला सेमीकंडक्टर फॅब्रिकेशन प्लांट उभारणार आहे. जो भारतीय संरक्षण दलांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळं आधुनिक युद्धासाठी आवश्यक असलेल्या तीन प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे. प्रगत सेन्सिंग, कम्युनिकेशन तसंच हाय-व्होल्टेज पॉवर इलेक्ट्रॉनिक्सचा यात समावेश आहे. इन्फ्रारेड, गॅलियम नायट्राइड आणि सिलिकॉन कार्बाइड सेमीकंडक्टर्सच्या निर्मितीच्या उद्देशाने स्थापन करण्यात येणारे फॅब, भारत सेमीकंडक्टर मिशन, तसंच भारत सेमी, 3आरडीटेक आणि यूएस स्पेस फोर्स यांच्यातील धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारीद्वारे सक्षम केलं जाईल.