हैदराबाद Atal Pension Scheme :चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत 56 लाखांहून अधिक लोकांनी अटल पेन्शन योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे. पेन्शन नियामक आणि विकास प्राधिकरणानं आज ही आकडेवारी जाहीर केली. या योजनेंतर्गत मासिक 4 ते 5 हजार रुपये पेन्शन दिली जाते. विशेषत: असंघटित क्षेत्रातील कामगारांसाठी सार्वत्रिक सामाजिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी 2015 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.
अटल पेन्शन योजना (APY):अटल पेन्शन योजना ही भारत सरकारनं सुरू केलेली एक सामाजिक सुरक्षा योजना आहे. या योजनेचा उद्देश भारतातील सर्व नागरिकांना 60 वर्षांनंतर आर्थिक सहाय्यता करणं आहे. अटल पेन्शन योजना (APY) असंघटित क्षेत्रावर लक्ष केंद्रित करणारी पेन्शन योजना आहे. ज्यामुळं असंघटित क्षेत्रातील सर्व नागरिकांना भारत सरकारनं हमी दिलेल्या किमान पेन्शनचा लाभ दिला जातो. ही एक परिभाषित लाभ योजना आहे. तुमच्या योगदानानुसार दरमहा तुम्हाला किमान ₹1000, ₹2000, ₹3000, ₹4000 किंवा ₹5000 च्या पेन्शनची हमी यातून मिळतेय.
काय आहे पात्रता? :अटल पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. तुम्ही खालील निकष पूर्ण केल्यास तुम्ही APY योजनेत सामील होऊ शकता.
- योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमचं वय किमान 18 वर्षे असलं पाहिजे.
- 40 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाहीय.
- तुमचं कोणत्याही बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असले पाहिजे.
- तुम्ही 1 ऑक्टोबर 2022 नंतर प्राप्तिकरदाते असाल तर, तुम्ही APY योजनेत सामील होण्यास पात्र असणार नाही.
असा करा ऑनलाईन अर्ज : भारतातील सर्व नागरिक (करदाते नसलेले) अटल पेन्शन योजनेत ऑफलाइन किंवा ऑनलाइन खातं उघडू शकतात.
ऑनलाइन : तुम्ही तुमचं अटल पेन्शन योजनेत (APY)खाते डिजिटल पद्धतीनं उघडू शकता. ऑनलाइन APY खातं उघडण्याच्या सुविधेचा लाभ घेण्यासाठी, तुम्हाला तुमचा आधार तुमच्या मोबाईल क्रमांकाशी लिंक करणं आवश्यक आहे.
- NSDL (नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड) वेबसाइटला भेट द्या (https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html).
- "अटल पेन्शन योजना" वर क्लिक करा आणि नंतर "ऑनलाइन अर्ज करा".
- वैयक्तिक तपशील, बँक खाते माहिती आणि पेन्शन योजना तपशीलांसह अर्ज भरा.
- आवश्यक कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती अपलोड करा (आवश्यक असल्यास).
- अर्ज करा.