हैद्राबाद Sukhoi 30 MKI aircraft : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीनं देशाचा संरक्षण विभाग बळकट करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. भारतीय हवाई दलानं आपल्या मुख्य लढाऊ विमान सुखोई-30 साठी 26 हजार कोटी रुपये खर्चून 240 एरो इंजिन खरेदी करण्याच्या प्रस्तावाला सोमवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
240 एरो-इंजिन खरेदी : एका निवेदनात म्हटलं आहे की, या एरो-इंजिनची डिलिव्हरी एक वर्षानंतर सुरू होईल. हवाई दलाच्या सुखोई 30 MKI लढाऊ विमानांसाठी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून खरेदी श्रेणी अंतर्गत 240 एरो-इंजिन (AL-31 FP) खरेदी केली जातील. या विमानांच्या खरेदीसाठी सर्व कर आणि शुल्कासह 26 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येईल.
54 टक्क्यांहून अधिक स्वदेशी पार्ट : संरक्षण मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात, म्हटलं आहे की, या इंजिनांमध्ये 54 टक्क्यांहून अधिक स्वदेशी बनावटीचे पार्ट असतील. एचएएलच्या कोरापुट विभागात या पार्टचं उत्पादन केलं जाईल. सुखोई-30 विमान हे हवाई दलातील सर्वात शक्तिशाली विमान आहे. HAL कडून या एरो-इंजिनचा पुरवठा हवाई दलाच्या ताफ्याच्या गरजा पूर्ण करेल. त्यामुळं देशाची संरक्षण क्षमता अणखी मजबूत होईल.