हैदराबाद : भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ही दळणवळण (Communication field) क्षेत्रात मागास समजली जाणारी सरकारी दूरसंचार कंपनी आता वेगानं सुधारणा करत आहे. कंपनी 4G आणि 5G नेटवर्कवर काम करत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला 5G नेटवर्क लॉंच होण्याची शक्यता आहे. मात्र, आता BSNL नं देशातील निवडक भागात पहिली फायबर आधारित इंट्रानेट टीव्ही सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे.
BSNL ची राष्ट्रीय वाय फाय रोमिंग सेवा :कंपनीनं ही सेवा IFTV या नावानं सुरू केली आहे. बीएसएनएलच्या नवीन लोगोच्या अनावरणासह इतर सहा नवीन सेवा गेल्या महिन्यात पहिल्यांदा लॉंच करण्यात आली होत्या. हे बीएसएनएलचं फायबर-टू-द-होम (FTTH) नेटवर्क वापरणाऱ्या वापरकर्त्यांना थेट टीव्ही सुविधा प्रदान करणार आहे. त्यातच BSNL नं राष्ट्रीय वाय फाय रोमिंग सेवा देखील सुरू केली आहे. ज्यामुळं कंपनीच्या ग्राहकांना देशभरातील BSNL हॉटस्पॉट्सवर हाय-स्पीड इंटरनेट वापरण्याची परवानगी मिळणतेय. तसंच ग्राहकांच्या डेटाची बचत देखील यामुळं होतेय.
BSNL IFTV सेवा :सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर एका पोस्टमध्ये, BSNL नं ही माहिती दिलीय. BSNL ची नवीन IFTV सेवा मध्य प्रदेश आणि तामिळनाडूमधील ग्राहकांना 500 हून अधिक थेट टीव्ही चॅनेलचा आनंद घेता येणार आहे. याशिवाय, ते पे टीव्ही सामग्री (Pay TV content) देखील प्रदान करेल. Reliance Jio आणि Bharti Airtel द्वारे ऑफर केलेल्या इतर लाइव्ह टीव्ही सेवांप्रमाणे स्ट्रीमिंगद्वारे वापरला जाणारा डेटा मासिक कोट्यातून वजा केला जातो. तसा डेटा BSNL वजा करणार नाहीय.