हैदराबाद Space Travel:अंतराळ प्रवासाचा अंतराळवीरांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर गंभीर परिणाम होऊ शकतो, असं एका अभ्यासात दिसून आलं आहे. अशा प्रवासामुळं त्यांना आजारपण आणि संसर्ग होण्याची शक्यता असते. अंतराळातील सूक्ष्म गुरुत्वाकर्षण वातावरणाचा मानवी शरीराच्या नैसर्गिक संरक्षणावर परिणाम होऊ शकतो, असा संशोधकांना संशय आहे. अनुवांशिक तंत्रज्ञानाचा वापर करून, कॅनडाच्या मॅकगिल विद्यापीठातील संशोधकांनी तीन महिन्यांत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक किंवा ISS वरील उंदरांच्या आतडे, कोलन आणि यकृतातील बदलांचं विश्लेषण केलंय.
रोगप्रतिकारक शक्ती कमी :जर्नल ऑफ स्पेस मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, अंतराळात दीर्घकाळ घालवलेल्या अंतराळवीरांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याचं दिसून आलं आहे. संशोधकांनी अंतराळ मोहिमेपूर्वी, तसंच नंतर अंतराळवीरांच्या रक्तच्या नमुन्यांचं विश्लेषण केलंय. तेव्हा अंतराळवीरांच्या पांढऱ्या रक्त पेशींच्या उत्पादनात लक्षणीय घट झाल्याचं आढळून आलं. या पेशी मानवी शरीरात संक्रमणाविरूद्ध लढा देतात. कमी गुरुत्वाकर्षणात अंतराळवीर राहिल्यामुळं रोगप्रतिकारक प्रणालीच्या सामान्य कार्यामध्ये बिघाड होतो. ज्यामुळं अंतराळवीरांना सर्दी, फ्लू सारख्या आजारांना बळी पडावं लागतं. शिवाय, अंतराळवीर पृथ्वीवर परतल्यानंतरही त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली दिसते. ज्यामुळं त्यांना दीर्घ कालावधीसाठी धोका उद्भवतो.
अंतराळवीरांसाठी चिंतेची बाब : "सखोल अंतराळ मोहिमांसाठी ही एक गंभीर चिंतेची बाब आहे. जिथं अंतराळवीरांना एका वेळी अनेक वर्षे प्रतिकुल वातावरणाला सामोरं जावं लागतं,"असं संशोधक डॉ. सारा जोन्स यांनी सांगितलं. "आम्हाला अंतराळवीरांच्या आरोग्यावरील धोका कमी करण्यासाठी धोरणं विकसित करणं आवश्यक आहे. दीर्घकालीन मोहिमांवर आमच्या अंतराळवीरांचं आरोग्य आणि सुरक्षितता सुनिश्चित करणं आवश्यक आहे."