छत्रपती संभाजीनगर Youth Commits Suicide :बँकेच्या कर्जाला कंटाळून तरुणानं आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. जयदत्त सुरभेये असं त्या आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे. ही घटना उस्मानपुरा परिसरात घडली असून या तरुणाकडं एका पतसंस्थेचं 2 लाखाचं कर्ज होतं. या प्रकरणी बदनापूर भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाच्या त्रासाला कंटाळून तरुणांनी आत्महत्या केल्याचा आरोप तरुणांच्या नातेवाईकांनी केला. मृत तरुणाकडं एक चिठ्ठी आढळून आल्याचा दावा देखील नातेवाईकांनी केला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटातर्फे करण्यात आली आहे. तर राजकीय द्वेशापोटी आरोप केल्याचं स्पष्टीकरण आमदार नारायण कुचे यांनी दिलंय.
गुन्हा दाखल करण्याची ठाकरे गटाची मागणी :उस्मानपुरा इथल्या जयदत्त सुरभेये या तरुणानं आत्महत्या केली. त्याच्याकडं सापडलेल्या एका चिठ्ठीत बदनापूरचे भाजपा आमदार नारायण कुचे आणि त्यांचे बंधू देविदास कुचे यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचं त्यानं लिहून ठेवल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केलाय. जयदत्त सुरभेये यानं बँकेकडून दोन लाखांचं कर्ज घेतलं होतं. पैशांच्या वसुलीसाठी आमदार आणि त्यांच्या भावानं धमकावल्यामुळे आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय. आमदार कुचे यांच्या पतसंस्थेतून तरुणानं कर्ज घेतलं होतं. कर्ज असल्यानं धमक्यांचा त्रास होत असल्यानं आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावाचं नाव आहे, असा दावा नातेवाईकांनी केला. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर शिवसेना ठाकरे गटाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी थेट पोलीस आयुक्त कार्यालय गाठलं. या तरुणाच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी भाजपाचे आमदार नारायण कुचे आणि त्यांच्या भावावर गुन्हा दाखल करून तातडीनं अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.