सातारा -संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण (जन्म -१९१३, मृत्यू - १९८५) यांची आज जयंती साजरी केली जाणार आहे. ते द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणूनही त्यांची निवड झाली होती.
यशवंतराव चव्हाण यांचा सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्रे या गावी १२ मार्च १९१३ रोजी जन्म झाला. त्यांना नवमहाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. त्यांनी सुमारे ४० वर्षांच्या कारकीर्दीत महाराष्ट्रातील राजकारणाला दिशा देण्याचं, समतोल आणि जातिभेदरहित राजकारणाचा वारसा देण्याचं कार्य केले. यशवंतराव चव्हाण यांनी कृषिविषयक विचार मांडताना शेतीच्या मालकी हक्काचा, भूमिहीनांचा प्रश्न आणि कृषी विकासासाठीच्या उपायांवर अधिक भर दिला. जमीन कसणारा व्यक्ती हा शेतजमिनीचा मालक असावा, असं त्यांनी मत मांडलं. त्यांनी भूमीहीन शेतकऱ्यांसाठी मांडलेले विचार महत्त्वाचे ठरले आहेत.
कृषी विकासासाठी महत्त्वाचे विचार-रसामाजिक क्षमता आणि सामाजिक न्यायाच्या दृष्टीकोनातून यशवंतरावांनी शेतीचा विचार केला. शेती व्यापारी तत्वानं केली पाहिजे. शेतीच्या आधुनिकीकरणाच्या मार्गातील अडथळे दूर केले पाहिजेत. नद्यांच्या पाण्याचा शेतीसाठी वापर केला पाहिजे. नद्यांवर धरणं बांधली पाहिजेत. धरणं बांधल्याने विस्थापित होणाऱ्या लोकांचं पुनर्वसन केलं पाहिजे. शेतकऱ्यांनी कृषी शास्त्राचा अभ्यास केला पाहिजे, असे महत्त्वाचे विचार त्यांनी कृषी विकासासाठी मांडले.
साहित्यिक म्हणूनदेखील उमटविला ठसा-यशवंतराव चव्हाण यांनी काही काळ देशाचे उपपंतप्रधान आणि संरक्षणमंत्री म्हणून काम केलं. उत्कृष्ट संसदपटू, उदारमतवादी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ख्याती होती. ते रसिक, पुस्तकप्रेमी आणि साहित्यिकही होते. 'युगांतर', 'सह्याद्रीचे वारे', 'कृष्णाकाठ', 'ऋणानुबंध' ही त्यांची मराठीतील मौलिक अशी साहित्यसंपदा आहे.
विविध पदांवर बजाविल्या भूमिका-१९५६ मध्ये स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड झाली. तसेच मुंबईसह स्वतंत्र महाराष्ट्र निर्माण झाल्यानंतर (१ मे, १९६०) ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्रीही झाले. १९६२ मध्ये चीन युद्धावेळी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी यशवंतरावांची देशाच्या संरक्षणमंत्री पदावर निवड केली. त्यांनी उपपंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, अर्थमंत्री, संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री ही पदे त्यांनी यशस्वीरीत्या भूषविली होती.
अजित पवार यांनी यशवंतराव यांच्या स्मृतींना केलं वंदन-उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्याशी फारकत घेऊन भाजपाबरोबर सत्तेत सहभाग घेतला. त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतींना वंदन करणारी पोस्ट एक्स या मीडियावर पोस्ट केली. त्यांनी पोस्टमध्ये म्हटले, आपल्या दूरगामी दृष्टीकोनातून प्रगतीला नवी दिशा देत राज्याच्या विकासाचं चाक अधिक गतिमान करणारे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार, माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात रुची ठेवणाऱ्या चव्हाण साहेबांमुळेच कृषी व औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य कायम आघाडीवर राहिला. महाराष्ट्राच्या आजवरच्या जडणघडणीत चव्हाण साहेबांचा वाटा हा सिंहाचा आहे. त्यांच्या स्मृतींना वंदन करतो.
हेही वाचा-