मुंबई Worli Hit and Run Case Updates :मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनची घटना घडलीय. या घटनेत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी पालघरचे शिवसेनेचे (शिंदे गट) उपनेते राजेश शाह यांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र, त्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आलं. तर यातील मुख्य आरोपी असलेला राजेश शाह यांचा मुलगा मिहिर शाह अद्यापही फरार आहे. मिहिर शाह याच्या अटकेला होणाऱ्या दिरंगाईवरुन मृत महिल्याचे पती प्रदीप नाखवा यांनी संताप व्यक्त केलाय.
प्रदीप नाखवा नेमकं काय म्हणाले? : प्रदीप नाखवा यांनी अपघाताचा घटनाक्रम सांगितला. ते म्हणाले, "आम्ही मच्छीमार असल्यानं आणि आमच्या रोजच्या कामाचा भाग असल्यानं रविवारी पहाटे 4 वाजता मासे खरेदी करून परतत होतो. आमची गाडी एका कोपऱ्यातून 30 ते 35 च्या स्पीडनं चालली होती. तेव्हा अचानक एक कारनं आम्हाला जोरदार धडक दिली. तेव्हा काय घडलं, हे आम्हाला कळालच नाही. आम्ही दोघं गाडीच्या बोनेटवर पडलो. मी त्याला थांब म्हटल्यावर त्यानं ब्रेक मारला. तेव्हा आम्ही दोघं खाली पडलो. मी डाव्या बाजूला पडलो. तसंच मी तिला खेचणार तितक्यात त्यानं तिच्या अंगावर गाडी घातली. तिला सीजी हाऊस ते लिंक रोडपर्यंत फरफटत नेलं."
राजकीय नेत्याचा मुलगा असल्यानं अटकेला दिरंगाई : "जर ती त्याची बहीण असती तर त्यानं असंच केलं असतं का? 24 तासाहून अधिक वेळ झाला, तरी अजूनही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. असाच गुन्हा जर कोणा गरीबाच्या हातून झाला असता तर त्याला लगेच अटक करण्यात आली असती. पण आरोपी राजकीय नेत्याचा मुलगा असल्यानं त्याला अटक होत नाही," असा आरोप नाखवा यांनी केला. पुढे नाखवा म्हणाले, " मी कुणाला न्याय मागू? माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय. पोलीस म्हणतात आरोपीचा शोध सुरू आहे. पण हे सर्व राजकारण आहे. आरोपीला अटक झालेली नाही. अटक होणारही नाही, ही मला गॅरंटी आहे," असे ते म्हणाले.