मुंबई Worli Hit And Run Accident : राज्यात मागील काही दिवसांपासून हिट अँड रन प्रकरणाच्या घटना वाढताना पाहायला मिळत आहेत. नुकतेच पुण्यातील पोर्शे कार हिट अँड रन प्रकरण ताजं असतानाच आता मुंबईतील वरळी येथे हिट अँड रनची घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला. याप्रकरणी शिवसेनेचे पदाधिकारी राजेश शहा यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, यातील आरोपी मिहिर शहा आणि त्याचा ड्रायव्हर अद्याप फरार आहेत. तर दुसरीकडं या प्रकरणी पोलीस सखोल चौकशी करत असून, आता या प्रकरणावरून विरोधक देखील आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे.
प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (ETV BHARAT Reporter) राजकीय हस्तक्षेप नको : वरळीत हिट अँड रनच्या घटनेत नाकवा कुटुंबातील कावेरी नाखवा या महिलेचा मृत्यू झाला. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर राजकीय नेते नाकवा कुटुंबाची भेट घेत आहेत. वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी देखील नाकवा कुटुंबाची भेट घेतली. यावेळी आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी संवाद साधताना म्हटलं की, "ही घटना अतिशय गंभीर आहे. आरोपीला पोलिसांनी पकडून त्याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. याप्रकरणात राजकीय हस्तक्षेप न होता निष्पक्षपणे पोलिसांना तपास करु दिला पाहिजे. कोणाचाही वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन गेला नाही पाहिजे. आम्ही या घटनेवरून राजकारण करत नाही. किंवा याला राजकीय रंग देत नाही. नाखवा कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे." तसेच मुंबईत गाड्या चालवण्याची पद्धत ही बिघडली आहे. मुंबईत चुकीच्या पद्धतीनं गाड्या चालवल्या जात असल्याचंही आदित्य ठाकरे यावेळी म्हणाले.
सरकार कोणालाही पाठीशी घालणार नाही :"वरळीतील हिट अँड रन ही घटना अतिशय गंभीर आहे. याच्यातील जो आरोपी आहे, त्याला पोलीस शोधतील. आरोपी कोणीही असो आमच्या पक्षाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता जरी असला तरी त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. ज्या कुटुंबावर अन्याय झालाय त्यांना हे सरकार न्याय मिळवून देईल," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.
शिवसेनेचा कार्यकर्ता असला तरी कारवाई होणार : "कायद्यासमोर सर्व समान आहेत. त्यामुळं या घटनेतील दोषींना वेगळा न्याय दिला जाणार नाही. जे होईल ते कायदेशीररित्या होणार आहे. कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. वरळीत घडलेली हिट अँड रनची घटना अतिशय दुर्दैवी आणि दुःखद आहे. या घटना वारंवार होऊ नये यासाठी शासन आणि गृह विभाग उपायोजना करत आहे. विरोधी पक्षांना टीका करण्यापलीकडे काही काम नाही. जरी तो कार्यकर्ता शिवसेना पक्षाचा असला तरी त्याला कोणी पाठीशी घालणार नाही. सर्वांना एकसमान न्याय लागू करण्याचे काम या राज्यात सरकार करत आहे. सर्वांना समान न्याय देण्याची भूमिका सरकारची आहे," असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा
- 17 कोटी 94 लाख 75 हजारांचा गंडा : आरोपीला पोलिसांनी तिरुपतीत बेड्या ठोकल्या, एक वर्षापासून होता फरार - Fraud of investors in Mumbai
- अर्धनग्न अवस्थेत आढळला महिलेचा मृतदेह; अत्याचाराचा संशय - Woman Body Found Palghar
- धावत्या दुचाकीवर रिल काढणं पडलं महागात; एकाचा जागीच मृत्यू तर एक गंभीर जखमी - Beed Accident