महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जागतिक हत्ती दिवस: मुंबईकरांची ६२ वर्षांची अनारकली! - World Elephant Day 2024 - WORLD ELEPHANT DAY 2024

62 Years Old Elephant 'Anarkali' : मुंबईच्या प्रसिद्ध राणी बागचं नाव तुम्ही ऐकलंच असेल. मात्र, तुम्हाला तेथील प्रसिद्ध 'अनारकली' माहित आहे का? आज (12 ऑगस्ट) जागतिक हत्ती दिनानिमित्त मुंबईच्या या 62 वर्षीय 'अनारकली' विषयी जाणून घेऊया.

World Elephant Day 2024 know about Mumbai Byculla Zoo 62 years old Elephant 'Anarkali'
मुंबईतील 62 वर्षीय 'अनारकली' हत्तीण (ETV Bharat Reporter)

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 12, 2024, 9:33 PM IST

Updated : Aug 12, 2024, 10:17 PM IST

मुंबई 62 Years Old Elephant 'Anarkali' : दरवर्षी 12 ऑगस्ट हा दिवस 'जागतिक हत्ती दिन' म्हणून साजरा केला जातो. यानिमित्तानं आज (12 ऑगस्ट) आपण मुंबईतील 62 वर्षीय हत्तीणी विषयी जाणून घेऊया. आता तुम्ही म्हणाल मुंबईत जंगल नाही. जिकडं पहावं तिकडं उंच इमारती अशात हत्ती कुठे आला? तर हा हत्ती आहे वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालयातील. ज्याला सर्व मुंबईकर 'राणीची बाग' नावानं ओळखतात. याच राणीच्या बागेत एक 62 वर्षांची हत्तीण आहे. ती राणीच्या बागेतील विविध बदलांची आणि इतिहासाची साक्षीदार आहे. तीचं नाव 'अनारकली' आहे.

62 वर्षीय 'अनारकली' : मुंबईत सहकुटुंब कुठं फिरण्याचा प्लॅन ठरला तर सर्वात आधी नाव येतं ते म्हणजे 'राणीची बाग'. याच राणीच्या बागेत अनारकली आहे. मागची अनेक वर्ष या अनारकलीनं मुंबईकरांच्या प्राण्यांविषयीच्या ज्ञानात भर घातलीय. त्याचं कारण म्हणजे या उद्यानाला भेट देण्यासाठी दररोज अनेक शालेय सहली येत असतात. ही मुलं या प्राण्यांना बघतात आणि संग्रहालयातील तज्ञांकडून या प्राण्यांबाबत माहिती घेतात. आता अनारकली बाबत बोलायचं झालं तर अनारकलीला अंदाजे साधारण 60 ते 70 च्या दशकात जिजामाता उद्यानात आणल्याचं येथील प्राणी तज्ञ डॉक्टर अभिषेक साटम सांगतात. आज अनारकलीचं वय 62 वर्ष असून ती लहान मुलांचं आकर्षण आहे.

अशी केली जाते देखभाल : जगभरात हत्तींच्या तीन प्रजाती आहेत. त्यातील दोन प्रजाती या आफ्रिकन हत्तींच्या आहेत. तिसरी प्रजाती ही आशियाई हत्तींची आहे. आफ्रिकेतील दोन प्रजातींमध्ये एक जंगली हत्ती तर दुसऱ्या वाळवंटी हत्ती अशा दोन प्रजाती आहेत. आपल्याकडं हत्ती हे आशियाई हत्ती प्रजातीमध्ये येतात. यातील 60% आशियाई हत्ती हे फक्त आपल्या भारत देशात आहेत. जिजामाता उद्यानातील अनारकलीदेखील याच आशियाई हत्तींच्या प्रजातीमधील आहे. डॉक्टर अभिषेक साटम सांगतात की, "अनारकलीचा दिवस सकाळी लवकर सुरू होतो. तिच्यासाठी आहारतज्ञ आहेत. तिची देखभाल करण्यासाठी दोन माहूतदेखील आहेत. हे माहूत अनारकली जिथे राहते त्याच्या बाजूलाच राहतात. त्यांना तिथं घर देण्यात आलंय. अनारकलीचं आवडतं खाद्य म्हणजे ऊस, केळी, गव्हाचा कोंडा," असं त्यांनी सांगितलं.

अनारकलीला आवडतो पाऊस : मुंबईकरांच्या आवडत्या अनारकलीचा आहारदेखील तितकाच खास आहे. "अनारकलीला रोज सकाळी गव्हाचा कोंडा खायला दिला जातो. हा गव्हाचा काळी मिरी, लवंग इतर विविध प्रकारचे मसाले आणि गुळ टाकून तयार केला जातो. यामुळं तिची पचन इंद्रिय आणि चव घेण्याची क्षमता अधिक चांगली राहते. अनारकलीला पाऊस खूप आवडतो. पाऊस पडायला लागला की ती तिच्या शेल्टरमधून बाहेर येते. चिखलात लोळते. गवत तोडून अंगावर उडवते. रोज सकाळी तिची देखभाल घेणारे कर्मचारी तिला फिरवतात," असंही साटम यांनी सांगितलं.

पर्यावरणीय चक्रातील हत्ती महत्त्वाचा प्राणी-पुढं ते म्हणाले की, "हत्ती हा आपल्या पर्यावरणीय चक्रातील एक महत्त्वाचा प्राणी आहे. हत्तींमुळं पर्यावरणात बदल घडत राहतात. हत्ती हा सतत चालणारा प्राणी आहे. त्यामुळं ते जेव्हा चालत असतात त्यावेळी ते विविध फळ आणि पाला खात असतात. यातून एका ठिकाणची वनसंपदा दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यास मदत होते. आपल्या देशात सध्या हत्तींचे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. यासाठी अनेक अद्यावत तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय. सोबतच देशात हत्तींसाठी 30 राखीव जंगलं ठेवण्यात आलीय. यात महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग गोवा बॉर्डरवरील दोडामार्ग जंगल यांचा समावेश आहे." त्यामुळं मुंबईतील सिमेंटच्या जंगलात तुम्हाला पर्यावरणातील हा महत्त्वाचा घटक पाहायचा असेल तर भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.

हेही वाचा -

  1. हॅपी बर्थडे हत्ती... 'जागतिक हत्ती दिना'च्या पर्वावर कोलकासमध्ये खास सेलिब्रेशन - Elephant Day celebrated in Amravati
  2. जागतिक हत्ती दिन 2024 विशेष: झारखंडच्या हत्तीचं 'हे' वैशिष्ट्य ठरतंय खास, पलामू व्याघ्र प्रकल्पात आहेत 180 हून अधिक हत्ती - World Elephant Day 2024
  3. मेळघाटात कोलकास हत्ती सफारी; कोलकासला पर्यटकांची पसंती, इंदिरा गांधींनाही घातली होती भुरळ
Last Updated : Aug 12, 2024, 10:17 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details