कोल्हापूर :स्वतःच्या अपंगत्वावर मात करुन, जिद्दीनं हवं ते करू शकतो, याचं उदाहरण म्हणजे कोल्हापूरचे किरण बावडेकर. आता सगळं संपलं, असं वाटत असतानाच जिद्द आणि इच्छाशक्तीच्या बळावर किरण बावडेकर यांनी अपंगत्वावर मात करून शरीरसौष्ठव, स्विमिंग आणि थाळीफेकीत राष्ट्रीय स्तरावर मजल मारली. दोन्ही पाय अशक्त असूनही कठोर मेहनत, काहीतरी करून दाखवायचं, ही उर्मी बाळगून कोल्हापुरातील निगवे दुमाला गावचे किरण बळवंत बावडेकर यांनी क्रीडा क्षेत्रातील यश अक्षरशः खेचून आणलं. मात्र, प्राणपणानं मिळवलेली पदकं आणि प्रमाणपत्राची जागा अडगळीच्या खोलीतचं बंदिस्त झाली. दोन्ही पायांनी अपंग असूनही देदिप्यमान यश मिळवलेल्या या खेळाडूची शासन दरबारी मात्र उपेक्षा झाली आहे. 'जागतिक अपंग दिना'निमित्त पाहूया कोल्हापुरातील किरण बावडेकर यांची प्रेरणादायी कहाणी.
कुस्तीच्या सरावाला वेळ मिळत नसल्यानं शरीरसौष्ठवाचा निर्णय :मूळचे कोल्हापुरातील कसबा बावडा येथील किरण बावडेकर वडिलांच्या शिक्षकी नोकरीमुळं करवीर तालुक्यातील निगवे दुमाला येथे स्थायिक झाले. किरण बावडेकर यांना लहानपणी ताप आल्याचं निमित्त झालं आणि वयाच्या तिसऱ्या वर्षी पोलिओ आजारांनं त्यांना गाठलं. अपंगत्व घेऊनच आयुष्य जगावं लागेल, असा सल्ला डॉक्टरांनी बावडेकर यांच्या आई वडिलांना दिला. आईच्या मदतीनं उठणं, बसणं, चालणं यातच त्यांचं बालपण गेलं. किरण मराठी शाळेत असताना वडणगे येथील हनुमान तालमीत कुस्ती बघायला गेले, त्यावेळी सोबतच्या सवंगड्यांनीच त्यांच्या अपंगत्वाची खिल्ली उडवली. त्यानंतर किरण यांनी लाल मातीत कुस्तीचे धडे घेतले, याच दरम्यान कशीबशी दहावीची परीक्षा पास होऊन अक्षरजुळवणी आणि मुद्रीतशोधक या विषयात औद्योगिक प्रशिक्षण घेतलं. कोल्हापुरातील एका नामांकित दैनिकाच्या मुद्रणालयात त्यांना नोकरीही लागली, लाल मातीच्या कुस्तीनं भरभक्कम शरीरासह जगण्याचंही बळ दिलं होतं, यातूनच कुस्तीच्या सरावाला वेळ मिळत नसल्यानं बावडेकर यांनी शरीरसौष्ठव करण्याचा निर्णय घेतला.
शासनानं दखल घ्यावी : किरण बावडेकर सायंकाळी पाच ते मध्यरात्री दोन पर्यंत नोकरी करायचे. त्यानंतर पहाटे चार ते सकाळी अकरापर्यंत कोल्हापूर महापालिकेच्या गांधी मैदान येथील व्यायामशाळेत प्रशिक्षक सुभाष साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करायचे. सुविधांची वानवा असतानाही 1983-84 या वर्षी 'भारत श्री' आणि 'महाराष्ट्र श्री' होण्याचा बहुमान त्यांनी पटकावला. यासोबतच स्विमिंग आणि थाळीफेक, भालाफेक स्पर्धांमध्येही राष्ट्रीय स्तरावर मिळवलेली सुवर्णपदकं किरण यांची आतापर्यंतची बहुमूल्य संपत्ती आहे. शरीराला असलेल्या 75 टक्के अपंगत्वावर मात करून मिळवलेल्या या यशाची मात्र कोणत्याही शासकीय यंत्रणेनं दखल घेतली नाही. ज्या महापालिकेच्या व्यायाम शाळेत बावडेकर यांनी कसून सराव केला, त्या महापालिकेनं कधी साधा पुष्पगुच्छही दिली नाही. जिल्ह्यातील अनेक राज्यकर्त्यांनी जुजबी आश्वासन देऊन नोकरी मिळवून देतो, काम चालू ठेव, असा सल्ला देण्यापुढे काहीच केलं नाही. मात्र समाजातील होतकरू तरुणांना व्यायामाकडं वळवण्यासाठी पदरमोड करून निगवे दुमाला गावातच आपले प्रशिक्षक सुभाष साळुंखे यांच्या नावानं व्यायाम शाळा सुरू करून किरण बावडेकर आपला उदरनिर्वाह करत आहेत. क्रीडा क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल शासनानं आपली दखल घ्यावी, इतकी माफक अपेक्षा या राष्ट्रीय खेळाडूनं केली आहे.