मुंबईWomen Policy Announced:राज्याचं चौथं महिला धोरण गेल्या तीन वर्षांपासून रखडलं होतं. या महिला धोरणाचा मसुदा तीन वेळा बदलण्यात आला. अखेर राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी राज्याचं चौथे महिला धोरण आज (7 मार्च) जाहीर केलं. या महिला धोरणाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली आहे. राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि विकासासाठी अष्टसूत्रीच्या माध्यमातून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असल्याची माहिती तटकरे यांनी दिली. राज्याच्या या महिला धोरणाचं वैशिष्ट्य म्हणजे, महिला धोरणाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, याकडे आता लक्ष असणार आहे.
काय आहे महिला धोरणात :राज्यातील दुर्लक्षित, दुर्गम आणि पोहोचण्यास कठीण अशा आदिवासी भागात मोफत आरोग्य तपासणी शिबिरे घेणं. कर्करोग, मूत्रमार्ग संक्रमण, क्षयरोग, रजो निवृतीच्या समस्या इत्यादीसाठी निदान, उपचार सुविधा उपलब्ध करून देणे, महिलांची संख्या जास्त असलेल्या आस्थापनांच्या ठिकाणी पाळणाघर सुरू करणं. आदिवासी मुलींच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देणं, सर्व पोलीस मुख्यालयांमध्ये भरोसा कक्ष स्थापन करणं, महानगरपालिका, नगरपालिका प्रभागांमध्ये महिला बचत गटांसाठी स्टॉल जागा उपलब्ध करून देण्याचा विचार करणं यांचा समावेश आहे. यासह ऊस तोडणी सारख्या हंगामी काम करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृहे स्थापनेचा विचार करणं, शाश्वत नैसर्गिक संसाधन, व्यवस्थापन, हवामान बदल अनुकूलन या संदर्भातील लवचिक धोरणं तयार करणं, मुली आणि महिला खेळाडूंसाठी पायाभूत सुविधा, प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि अनुषंगिक पाठबळ देण्यासाठी विशेष क्रीडा धोरण जाहीर करण्यात येणार असल्याचंही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं.