नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयात नवजात बाळाची अदलाबदली केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. जिल्हा रुग्णालयात दाखल झाल्यानंतर गरोदर महिलेला मुलगा झाला होता. पण डिस्चार्ज देत असताना हातात मुलगी देण्यात आल्याचा आरोप करत नातेवाईकांनी बाळाचा स्वीकार करण्यास नाकार दिला. जिल्हा शल्य चिकित्सकांनी याबाबत समिती गठीत करत चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
नेमकं प्रकरण काय? :नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालय हे नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणामुळं चर्चेत असतं. आता या रुग्णालयात चक्क बाळाची अदलाबदली झाल्याचं समोर आलं आहे. या घटनेनंतर बाळाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात एकच गोंधळ घातला. प्रीती पवार नावाची महिला रविवारी (13 ऑक्टोबर) रात्री बाळंतपणाला रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी या महिलेनं मुलाला जन्म दिला असं सांगण्यात आलं. मुलगा जन्माला आला हे ऐकताच पवार कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. तसंच रुग्णालयाच्या रजिस्टरमध्येही मुलाच्या जन्माची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी (15 ऑक्टोबर) रात्री या महिलेला डिस्चार्ज देण्यात आला, तेव्हा त्यांच्या हाती मुलगी देण्यात आली. या प्रकारामुळं संबंधित महिला आणि कुटुंबाला धक्काच बसला. त्यांनी मुलगी घेण्यास नकार दिला. या घटनेनंतर रुग्णालयात एकच गोंधळ उडाला.