नाशिक : शहरातील सातपूर भागात डेंग्यूची लागण झालेल्या एका महिलेसह पाच वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याने महानगरपालिकेचे सुस्त असलेलं आरोग्य प्रशासन आता जागं झालं आहे, महानगरपालिका कर्मचाऱ्यांनी डेंग्यूची उत्पत्तीस्थळे शोधण्यासाठी धावपळ सुरू केली आहे..
दोघांचा मृत्यू :नाशिक शहरातील सातपूर भागात डेंग्यू आजारानं थैमान घातलं आहे. विविध रुग्णालयात 40 हून अधिक डेंग्यू बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सातपूर भागातील आयुष दातार या पाच वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. तसेच पंधरा दिवसापूर्वीच मधू निर्मळ या महिलेचाही डेंग्यूने मृत्यू झाला होता. सातपूर परिसरात सप्टेंबर महिन्यातही 150 हून अधिक डेंग्यू बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, महानगरपालिका प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या घटनेनंतर महानगरपालिकेच्या आरोग्य प्रशासनाला जाग आली असून, महानगरपालिकेच्या पथकाने सातपूर भागातील श्रमिक नगरमधील आयुष दातार राहत असलेल्या कठेपठार व शालेय परिसरात पाहणी करत औषधाची फवारणी केली.
औषध फवारणी करावी : "पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिकेचे कर्मचारी डेंग्यूची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यासाठी आली होती. त्यावेळी त्यांनी फवारणी देखील केली. मात्र, त्यानंतर ते फिरकलेच नाहीत. परिसरात सर्वत्र कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वारंवार महानगरपालिका प्रशासनाला याबाबत कळवले. मात्र, त्याचा काही उपयोग होत नाही. लहान मुले या परिसरात खेळत असतात. आमच्या परिसरातील आयुष या पाच वर्षीय मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाला. त्यामुळे आम्ही भयभीत झालो आहोत. महानगरपालिका प्रशासनाने या भागातील डेंग्यूची उत्पत्तीस्थळे तत्काळ नष्ट करावी," अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली.
2 लाख घरांची तपासणी : "नाशिक शहरात डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या वाढताच नाशिक महानगरपालिकेने मोहीम हाती घेत शहरातील 2 लाख 4 हजार 891 घरांना भेटी दिल्या. त्यातील 3 हजार 50 घरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून आल्याचा दावा महानगरपालिकेने केला आहे. शहरात डेंग्यूबाधित रुग्ण आढळलेल्या भागात महानगरपालिकेकडून औषध फवारणी केली जात आहे. नागरिकांनी सुद्धा आपल्या घरात पाणी जास्त दिवस साचणार नाही आणि त्यातून डेंग्यूच्या अळ्यांची उत्पत्ती होणार नाही याची काळजी घ्यावी, असं आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ तानाजी चव्हाण यांनी नागरिकांना केले.