अमरावती Ranbhaji festival in Melghat : पावसाळ्यात मेळघाटच्या जंगलात अनेक पौष्टिक आणि आयुर्वेदिक रानभाज्या मिळतात. या रानभाज्यांची माहिती मात्र प्रत्येकाला आहे असं नाही. या भागातील आदिवासींना मात्र रानभाज्यांची चांगलीच जाण आहे. या रानभाज्यांचं महत्त्व इतरांनाही कळावं आणि सर्वांनी एकत्रित येऊन या रानभाज्यांवर ताव मारावा यासाठी जैतादेही येथील जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळेत खास रानभाजी महोत्सव साजरा करण्यात आला.
रानभाज्या आरोग्यासाठी गुणकारी : आता पावसाळ्यामध्ये मेळघाटच्या जंगलात अंबाडी, पिंपळ, अळू, कांचन, काटेमाट, गुळवेल, करटोली, वाघाटी, दिवटी, बांबूचे कोंब अशा रानभाज्यांचा या उत्सवात समावेश होता. निसर्गातील या रानभाज्यातून महत्वपूर्ण जीवनसत्वं शरीराला मिळतात. रासायनिक तसंच कुठलेही हानिकारक घटक या रानभाज्यांमध्ये नसल्यामुळे आरोग्यासाठी त्या अतिशय गुणकारी असल्याची माहिती जैतादेही येथील शाळेचे मुख्याध्यापक गणेश जामूनकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली. वर्षातून एकदाच या रानभाज्या खायला मिळतात. मेळघाटातील आदिवासी बांधव अतिशय कमी तेलात आणि कुठलाही भडक मसाला न वापरता या भाज्या बनवतात. "आमच्या शाळेत सर्वच विद्यार्थी हे आदिवासी समुदायातील आहेत. त्यांच्या मार्गदर्शनात आणि खास त्यांनी जंगलातून आणलेल्या रानभाज्या आम्ही आमच्या शाळेत प्रधानमंत्री पोषण शक्ती अभियानांतर्गत रानभाजी उत्सवानिमित्त केल्या आणि चाखल्या." असं गणेश जामूनकर यांनी सांगितलं.
विद्यार्थ्यांमध्ये उत्साह : जैतादही येथील शाळेच्या आवारात विविध वृक्षांसह काही रानभाज्या देखील लावण्यात आल्या. शाळेच्या आवारातील रानभाज्यांसह गावालगत जंगलात असणाऱ्या रानभाज्या तोडून आणण्याची भूमिका ही विद्यार्थ्यांची होती. शिक्षकांनी आपल्या शाळेत रानभाजी महोत्सव आपण घेऊ असं केवळ म्हटलं होतं. मात्र विद्यार्थ्यांनी घेतलेल्या पुढाकारानं या परिसरात असणाऱ्या आठ ते दहा रानभाज्या शाळेत खास चुलीवर बनवण्यात आल्या. पोषण आहार शिजवणारी शाळेतील सेविका आणि तिच्यासोबत पाच सहा विद्यार्थ्यांनी मिळून कर्टुले, वाघाटी, दिवटी, कांचन, पिंपळ यांच्या भाज्या तयार केल्या. बांबूच्या कोंबाची खास भाजी देखील या उत्सवानिमित्त बनवण्यात आली. नव्याने आलेले बांबूचे कोंब शिळून त्यांना उकळून आणि त्याचा गर काढून बांबूची खास भाजी या उत्सवानिमित्त बनवण्यात आली. आदिवासी बांधव बांबूच्या भाजीला केलटाची भाजी असं म्हणतात. केलटाची भाजी सर्व रानभाज्यांमध्ये अतिशय पौष्टिक आहे, अशी माहिती देखील गणेश जामूनकर यांनी दिली.