मुंबई-आरबीआयने न्यू इंडिया सहकारी बँकेवर अचानक निर्बंध टाकल्यानंतर खातेधारकांचे धाबे दणाणले आहेत. अनेकांचे घर हे ठेवींवरील व्याजावर चालत होते. मात्र, आता आयुष्याची गोळा केलेली जमापुंजी परत मिळणार का, या भीतीने ग्राहकांनी टाहो फोडला. आरबीआयने केलेली कारवाई ही एका रात्रीत झालेली नाही. बँकेच्या व्यवहारावर आणि रोखीवर आरबीआयने ठपका ठेवत कारवाई केलेली आहे. बँकेच्या व्यवहारावर काही महिन्यांपासून आरबीआयचे लक्ष होते. बँक सातत्याने तोट्यात होती. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये बँकेला 53 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बँकेचा एनपीएदेखील वाढला. त्यामुळे आरबीआयला ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी कारवाई करावी लागली आहे.
बँकेकडे 150 कोटी रुपयांचे भांडवल :न्यू इंडिया सहकारी बँकेच्या 2023-24 या वर्षीच्या आर्थिक ताळेबंदानुसार, बँकेला 2022-23मध्ये 30.74 कोटी तर 2023-24मध्ये 22.77 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बँकेकडे 150 कोटी रुपयांचे भांडवल आहे. मात्र, एकूण तोटा हा 200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्यामुळे बँक अडचणीत आली आणि आरबीआयला कारवाई करावी लागली. दरम्यान, बँकेच्या विविध शाखांमध्ये पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही काही शाखांमध्ये जाऊन विचारपूस केलीय. आम्ही कोणतीही चौकशी करण्यासाठी आलेलो नसून माहिती घेण्यासाठी आल्याचे अधिकाऱ्यांनी नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. बँकेत येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला बँकेचे कर्मचारी आरबीआयच्या निर्देशांबाबतच माहिती देत आहेत. याशिवाय डिपॉझिट विमा योजनेतून 5 लाख रुपयांपर्यंतच्या ठेवींची रक्कम ग्राहकांना मिळेल, त्यासाठी रितसर अर्ज करण्यास बँकेतर्फे सांगण्यात येत आहे.
ठेवी वाढल्या पण तोटा आहेच : बँकेकडे 31 मार्च 2024 रोजी 2,436.37 कोटी रुपयांच्या ठेवी असल्याचे ताळेबंद अहवालात म्हटले होते. हाच आकडा 31 मार्च 2023 रोजी 2,405.86 कोटी रुपये एवढा होता. बँकेच्या ठेवी 30.51 कोटी रुपयांनी वाढल्या. मात्र, सलग दोन वर्षे बँक तोट्यातच आहे. 1174 कोटी रुपयांची एकूण कर्जाची थकबाकी असून एनपीएचे प्रमाण वाढून 7.96 टक्क्यांवर आले.
स्वतंत्र लेखापालच्या ऑडिट रिपोर्टमध्ये काय म्हटले? :बँकेचे स्वतंत्र ऑडिट करणाऱ्या यू. जी. देवी आणि कंपनी या संस्थेने अहवालात म्हटले आहे की, तपासणीमध्ये आम्हाला कुठेही असे आढळले नाही की, बँक आरबीआयच्या दिशानिर्देशांना डावलून व्यवहार करीत आहे. बँकेकडे 180.65 मालमत्ता अशा आहेत, ज्या तोट्यात आहेत तर, 5,188.69 मालमत्ता किंवा खाती अशी आहेत, जी संशयास्पद आहेत. त्यासाठी 27.51 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आरबीआयने काय म्हटले :आरबीआयने न्यू इंडिया सहकारी बँकेला नव्या ठेवी स्वीकारणे, कर्ज वितरण, नवी गुंतवणूक, मालमत्तांची विक्री करता येणार नाही, असे निर्देश दिले आहेत. बँकेचा परवाना रद्द करण्यात आलेला नाही, असेही आरबीआयने स्पष्ट केलेले आहे.
ग्राहकांनी काय सांगितले? :काही जणांचे बँकेकडे व्यावसायिक खाते आहे. त्यांची अडचण ठेवीदारांपेक्षा वेगळी आहे. आमच्याकडे येणारे पेमेंट आणि धनादेश जमा होतील का? अशी विचारणा आम्ही केली. त्यावर बँकेने नाही, असे उत्तर दिले. त्यामुळे आम्हाला ग्राहकांना स्टॉप पेमेंट सांगावे लागणार आहे. बँकेने आम्हाला 4-5 दिवसांनी संपर्क करण्यास सांगितल्याचे एका ग्राहकाने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले. तर, एक खातेदार बँकेत पैसे जमा करण्यासाठी आले होते. त्यांना आरबीआयने दिलेल्या निर्देशांबााबत माहितीच नव्हती. मात्र, ते कळताच त्यांचेही धाबे दणाणले. त्यांचे सुमारे 20 लाख रुपयांचे डिपॉझिट आहे, असे ते म्हणाले. सध्या निर्माण झालेल्या परिस्थितीवर बँकेने एक निवेदन जारी करुन माहिती द्यावी आणि ग्राहकांमध्ये निर्माण झालेली भीती दूर करावी, अशी अपेक्षा ग्राहकांनी व्यक्त केलीय.
न्यू इंडिया सहकारी बँक का आली अडचणीत? किती तोटा होता बँकेला? - NEW INDIA COOPERATIVE BANK
गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये बँकेला 53 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. बँकेचा एनपीएदेखील वाढला. त्यामुळे आरबीआयला ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी कारवाई करावी लागली आहे.
![न्यू इंडिया सहकारी बँक का आली अडचणीत? किती तोटा होता बँकेला? Why did New India Cooperative Bank get into trouble](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/14-02-2025/1200-675-23545151-thumbnail-16x9-newindiacoopbank-84-aspera.jpg)
न्यू इंडिया सहकारी बँक का आली अडचणीत? (Source- ETV Bharat)
Published : Feb 14, 2025, 7:40 PM IST
|Updated : Feb 14, 2025, 7:53 PM IST
Last Updated : Feb 14, 2025, 7:53 PM IST